युवकांमध्ये तेजस्वीता, तपस्वीता व तत्परता असावी- रमेश दाणे

0

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प

 

जळगाव;- तरुणाईप्रती दादा धर्माधिकारी यांना कमालीचा जिव्हाळा होता. तरुणांच्या उन्नतीसाठी तेजस्वीता, तपस्वीता व तत्परता त्यांच्यात असावी असे ते नेहमी सांगत असत, असे प्रतिपादन साम्ययोग साधनाचे संपादक रमेश दाणे यांनी केले. गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर रोजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत त्यांनी “दादा धर्माधिकारींचे विचार आणि युवक” या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्मधिकारी होते तर व्यासपीठावर गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, विदयापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एस. टी.इंगळे, ज्येष्ठ सर्वोदयी डॉ. सुगन बरंठ, एन. एस. एसचे सुमंतकुमार यादव, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या गीता धरमपाल यांची तर समोर श्रोते म्हणून बसलेले १० राज्यांमधील एनएसएस विद्यार्थी-विद्यार्थीनींची उपस्थिती होती.

२०२३ हे वर्ष महात्मा गांधींचे सहाध्यायी दादा धर्माधिकारी यांचे १२५ वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे त्या औचित्याने गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. आरंभी दादा धर्माधिकारी यांच्या जीवन, कार्य परिचयाची ध्वनिफित दाखविली गेली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी अनिलेश जगदाळे यांनी गीत गायन केले. वक्ते रमेश दाणे म्हणाले की, मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला दादा धर्माधिकारी, मा. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी आणि मा. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी अशा तीन पिढ्यांचा सहवास लाभला. सहजीवन आणि आत्मनिर्भरता त्याच प्रमाणे पुरुष निरपेक्ष जीवन आणि पुरुष विरहीत जीवन या दादा धर्माधिकारी यांच्या दोन्ही संकल्पना सोदाहरण समजावून सांगितल्या. भविष्यात महिलाच देशाला वाचवू शकतात कारण आजची स्त्री ही शिक्षण व अन्य सर्वच क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करीत आहे. याच स्त्रिला मनुष्य बनण्याची संधी मात्र दिली जात नाही याविषयीची खंत ही त्यांनी व्यक्त केली. महात्मा गांधीजींचे विचारांचा वारसा पुढे चालविणारे दादा धर्माधिकारी, मा. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांच्या समवेतच कान्हदेशातील बाळूभाई मेहता, धनाजीनाना चौधरी, भुसावळचे आण्णासाहेब दास्ताने यांच्याबाबत सांगितले. युवकांनी जीवनात नैतिकता वाढवावी असे आवाहन ही दाणे यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मा. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी अध्यक्षीय भाषणात युवकांनी संतुलन, संयम ठेवणे अपेक्षीत आहे. चांगले श्रोते बनल्या शिवाय तुम्ही बोलू शकत नाहीत. अपेक्षांची पूर्ती करणे हे आजच्या युवकांपुढील मोठे आव्हान आहे. महात्मा गांधीजींना जाऊन १५३ वर्षे झालीत तरी देखील आजच्या काळात महात्मा गांधी समर्पक कसे याबाबत त्यांनी प्रकाशझोत टाकला. माणूस जोडण्याची कला दादांमध्ये होते, ते तर स्नेहधारा होते. दादांच्यामते अंधेरे मे निराशा नही होती वो होता है तरुण! हे स्पष्ट करताना आन मिलो सजना चित्रपटातील ‘यहाँ वहाँ सारे जहां में तेरा राज है जवानी ओ दीवानी तू ज़िंदाबाद…’ या पंक्तींचा आधार घेऊन नेमकी संकल्पना पटवून दिली. आजची युवा पिढी चिंतन करत नाही असा आरोप ज्य़ेष्ठांचा असतो ते खरे ही असेल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे परंतु त्या मोबाईलचा सुयोग्य उपयोग ही करून आपल्या व्यक्तीत्वाचा विकास तरुण मंडळी करू शकतात. युवा पिढीने चिंतनशील बनावे असा सल्लाही त्यांनी दिला.

गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष अनिल जैन यांनी युवकांशी संवाद साधला. युवकांच्या हातात देशाचे भवितव्य आहे. अशा युवकांपर्यंत महात्मा गांधीजींचे विचार पोहोचावे या उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशनची स्थापना २००७ मध्ये करण्यात आली. ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी होते. त्यांच्या मार्गदर्शनाने गांधी रिसर्च फाउंडेशन बनले आहे. दादा धर्माधिकारी यांच्या एक राष्ट्र’ भाषा, प्रांत, धर्म, जाती याने मुक्त होऊन एक राष्ट्र कसे बनविले पाहिजे, स्त्री- पुरुष समानता आदीबाबतचे विचार त्यांनी त्या काळी मांडले. युवकांबाबत दादा धर्माधिकारींचे अनेक विचार आहेत परंतु युवकांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करायला हवी व देश, समाजाला पुढे घेऊन जायला हवे. आपला देश जगातली पाचवी अर्थव्यवस्था म्हणून विकसीत झालेली आहे. पुढील पाच, सात वर्षात ती तिसरी अर्थव्यवस्था बनेल. ज्या पद्धतीने सारे भारतीय, पुढील पिढी काम करत आहेत त्यामुळे हे नक्कीच साध्य होईल. हे होत असताना अनेक आव्हानेही आपल्यासमोर ठाकले आहेत. या सगळ्या गोष्टींचे उत्तर पुढील पिढीला मिळवायचे आहे. त्यासाठी जुन्या पिढीच्या हिरोंचे काम विचारात घ्यावे लागेल. आजच्या पिढीसाठीची हिरो ही संकल्पना बलदली आहे. खरे हिरो दादा धर्माधिकारी, चंद्रशेखर धर्माधिकारी आणि शेती, शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर का केले असे आमचे वडील भवरलालजी जैन हे खरे हिरो ठरतात. अशा महापुरुषांच्या कार्याची प्रेरणा व त्यांची ऊर्जा घेऊन तुम्ही काम केले तर देशाचे भविष्य तुम्हीच उज्ज्वल करू शकतात असा आत्मविश्वास अनिल जैन यांनी व्यक्त केला.

हे महिलांच्या हक्कांचे समर्थन करणारे, समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देणारे, गांधी विचारांवर आधारित समाज घडवण्याची जाण असलेले तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यासाठीच समर्पित केले होते. न्या. धर्माधिकारी यांनी सर्वोदय वारसा आत्मसात केला आणि आदर्श जीवनाचा मार्ग स्वीकारला होता. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरही त्यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षाची भूमिका सक्रियपणे स्वीकारली आणि फाऊंडेशनच्या उपक्रमांना सर्वोदय साकार करण्याच्या दिशेने मार्गदर्शन केले. गांधींच्या विचारांवरील आधारित न्या. धर्माधिकारी यांचा चिरंतन वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ गांधी रिसर्च फाऊंडेशन व्याख्यानमाला आयोजित करत असते.

या स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. अभय बंग यांनी “दारूमुक्तीसाठी अहिंसक व विधायक चळवळ : गडचिरोली प्रयोग” या विषयावर गुंफले तर दुसरे पुष्प मेंढा लेखा गावाचे नायक श्री. देवाजी तोफा यांनी “सहमतीने गावाच्या स्वराज्याकडे” या विषयावर गुंफलेले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी तर आभार प्रदर्शन एनएसएसचे डॉ.सचिन नांद्रे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.