पाचोऱ्यात महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मागण्यांसंदर्भात आंदोलन सुरू

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाचोरा येथील श्री.शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे २१ फेब्रुवारी पासुन विविध मागण्यांसंदर्भात बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात पाचोरा महाविद्यालयाचे देविदास चौधरी, राजेंद्र पाटील, विजय सोनजे, संतोष महाजन, एन. पी. पाटील, एस. पी. जाधव, एस‌. एन. पाटील, सुनिल नवगिरे, प्रकाश सुर्यवंशी, श्रीमती जे. डी. जाधव, श्रीमती प्रमिला चौधरी, ऋषिकेश ठाकुर, अरविंद जगताप, नितीन पाटील, ऋषिकेश जाधव, घनशाम करोसिया, बी. पी. पवार, एस. जी. देशमुख यांचेसह मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी या बेमुदत आंदोलनात सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली सेवा अंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करुन सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना पुर्ववत लागु करावी, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०, २०, ३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापिठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागु व्हावी, सातव्या वेतन आयोगापासुन वंचित असलेल्या १ हजार ४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करुन विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागु झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करण्यात यावी, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता मिळावी, सन-२००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरुन त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.

या मागण्यांसंदर्भात पाचोरा येथील श्री.शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याआधी देखील संघटनेने दि. २ फेब्रुवारी २०२३ पासुन सुरु झालेल्या विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार, दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २:३० वाजेपर्यंत अवकाश काळात निदर्शने, दि. १५ फेब्रुवारी रोजी काळ्याफिती लावुन कामकाज करणे, दि. १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप अशा प्रकारची आंदोलने करुन शासन दरबारी आपल्या मागण्या पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.