सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या गटात विद्यापीठला देशात  ५० वे  स्थान

0

जळगाव ;-  भारतातील प्रतिष्ठीत अशा ‘द वीक’ या इंग्रजी नियतकालिकाने भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या केलेल्या सर्वेक्षणात  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने बहुविद्याशाखीय विद्यापीठाच्या गटात भारतात ५० वे तर पश्चिम विभागीय विद्यापीठांमध्ये ९ वे स्थान प्राप्त केले असून खान्देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

‘द वीक – हंसा’ रिसर्चतर्फे सन २०२४ साठी भारतातील सर्वोत्कृष्ट  विद्यापीठांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये पारंपारिक विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे, तांत्रिक विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे यांचा समावेश होता. बहुविद्याशाखीय, तांत्रिक, वैद्यकीय अशी वर्गवारी या सर्व्हेक्षणात करण्यात आली. या सर्व्हेक्षणासाठी विद्यापीठ स्थापनेचा कालावधी, विद्यापीठाला प्राप्त झालेली नॅक मूल्यांकनाची श्रेणी, विद्यापीठातील पायाभूत व इतर सुविधा, शिक्षक, संशोधन, अभ्यासक्रम व उपक्रम तसेच विद्यार्थी संख्या व त्या विद्यार्थ्यांना मिळणारा वाव आणि प्लेसमेंट आदी निकषांच्या आधारे हे सर्व्हेक्षण करण्यात आले. प्राथमिक सर्व्हेक्षणातील प्राप्त माहितीची शैक्षणिक तज्ज्ञांकडून वर्गवारी करण्यात आली.

देशातील विद्यापीठांच्या उत्कृष्ट बहुविद्याशाखीय गटात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ३०७ गुणांसह ५०व्या स्थानी आले. या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्लीने ७३१ गुण प्राप्त केलेले आहेत. या सर्व्हेक्षणात बहुविद्याशाखीय विद्यापीठांची विभागनिहाय वर्गवारी देखील करण्यात आली. पश्चिम विभागीय गटात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे ९ व्या स्थानावर आले. या पश्चिम विभागीय गटात, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे.

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने नॅक पुर्नमूल्यांकनात ‘अ’ श्रेणी कायम राखली. नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात विद्यापीठाने महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. संशोधनाला चालना मिळण्यासाठी विद्यापीठाने सामाजिक संस्था, उद्योग समुह यांच्या सहकार्याने काही योजना सुरु केल्या आहेत. विद्यापीठ अधिक समाजाभिमुख होण्यासाठी कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकार मंडळाच्या सहकार्याने प्रयत्नशील आहे. या सर्व्हेक्षणात विद्यापीठाला स्थान मिळाल्यामुळे खान्देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याची भावना शैक्षणिक क्षेत्रात उमटली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.