जिथे फुटलेल्या पक्षांचे उमेदवार, तिथे पाठ फिरवून बसले मतदार !

घटलेल्या टक्क्याचा फुटीशी संबंध? : पवार, शिंदेंना बसणार फटका

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांमधील मतदान पूर्ण झाले आहे. निवडणुकीच्या निकालास अद्याप वेळ आहे. पाचव्या टप्प्यात राज्यात सरासरी 54.33 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. वारंवार आवाहन करुनही प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत मतदाराला आणण्यात यंत्रणा आणि नेते-उमेदवारांना अपयशच आल्याचं चित्र आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यातील बदलते राजकारण, पक्षांतील फूट, विश्वासघाताची भावना आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मतदानाची घसरलेली टक्केवारी आणि पक्षातील फूट यांचा परस्पर संबंध असल्याचा संशय येण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे, जिथे फुटलेले पक्ष निवडणूक लढवत होते, अर्थात दोन राष्ट्रवादी किंवा दोन शिवसेना रिंगणात उतरल्या होत्या. तिथे विशेषतः टक्केवारी अधिक घसरल्याची आकडेवारी पाहायला मिळाली. म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार हे चार पक्ष जिथे लढले, तिथे मतदानाची टक्केवारी कमी झाली.

आकडेवारी काय सांगते?

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी 27 मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी गेल्या वेळी (2019) च्या तुलनेत कायम किंवा किंचित वाढ आहे. उर्वरित 21 मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी लक्षणीयरित्या कमी झाली आहे. फुटलेल्या पक्षांची जिथे लढत होती, तिथे विशेषत: मतदानाची टक्केवारी घसरल्याचे चित्र आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस – 5 पैकी 4 मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी घसरली, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना 15 पैकी 8 मतदारसंघांत मतदानाच्या टक्केवारीत घसरण झाली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढलेल्या 21 मतदारसंघांपैकी 10 ठिकाणी मतदानाचा टक्का घसरला आहे. भाजप निवडणूक लढलेल्या 28 पैकी केवळ 9 जागांवर मतदानाची टक्केवारी घसरली, तर 19 ठिकाणी टक्केवारीत वाढ झाली आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीत लढवलेल्या 17 पैका 7 ठिकाणी मतदानात घट, तर 10 जागांवर टक्केवारी वाढली आहे.

मतदान घसरण्यामागे कारण काय?

मतदानाची घसरलेली टक्केवारी आणि पक्षातील फूट यांचा परस्पर संबंध असल्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पक्ष जिथे फुटले, तिथे पक्ष संघटन कमकुवत झाले. पर्यायाने मतदारांना मतदानासाठी बाहेर नेण्यात उमेदवार आणि पक्षांचे कार्यकर्ते अपयशी ठरले. त्याशिवाय आपल्या मतदारसंघातील खासदार फुटल्याचा राग आणि मतदारांमध्ये असलेला राजकारणाविषयीचा उबग, हेही एक कारण मानले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.