कर्तव्य, संवेदना, जाणिव आणि जगण्याचा सुंदर मिलाफ, काव्यसंग्रह ‘नात्यांच्या पलीकडले’

0

लोकशाही विशेष लेख

शब्द, शब्द आणिक
शब्दांची गुंफूनिया माळ
होते जरी कविता….
आयुष्याच्या चढ उतरणीत
जीवन हे काव्य होऊनी जगावे.

असा सुंदर संदेश देत जगण्याची प्रेरणा देणारा ‘नात्यांच्या पलीकडले ‘ हा कवयित्री रिता जाधव यांचा ६७ कवितांचा काव्य संग्रह म्हणजे मानवी मन, नातं, आयुष्य या सोबत कर्तव्य, संवेदना, जाणिव व जगणं यांचा सुंदर मिलाफ आहे. माणूस व माणुसकीतला प्रेमभाव हा कवितेचा स्थायीभाव आहे.

मुक्तछंदातल्या वाचक मनावर अधिराज्य करणाऱ्या कविता अनुभव सिद्ध आहेत.या काव्यसंग्रहाची व्यापकता फार मोठी आहे.निसर्ग, प्रेम, कर्तव्य, जीवनातील गंमत,कृतज्ञता, जगण्याची उमेद, पोलिस व लाठी, आई, आजी, मुलगी, बाप, कन्या, शेतकरी, पाऊस, भिकारी, व्यसनमुक्ती या सारखे अनेकविध विषयांनी या काव्यसंग्रहाला वेगळपण आलयं.

जगण्याचं भाव व्यक्त करणाऱ्या,भावविश्वाशी नातं जोडणाऱ्या या कविता संग्रहातील कविता, स्त्रीने जरी लिहिलेल्या आहेत तरी वाचतांना त्या एका व्यक्तीच्या आहेत म्हणजे स्त्री -किंवा पुरुष हा लिंगभेद नष्ट करुन एका व्यक्तीमत्वाची अभिव्यक्ती या काव्यसंग्रहातून दिसते. हे वाचतांना जाणवते.नाते संबंध व नात्यांच्या पलिकडचा जिव्हाळा यांचा सुंदर संयोग वाचकांना दाखविण्याचं कौशल्य या काव्यसंग्रहात आहे. प्रतिमा व प्रतिकांची सुयोग्य मांडणी काव्यसंग्रहाची ऊंची सांगते.

हा काव्यसंग्रह जगण्याचं गुपित सांगतो, संवेदनशिल बनवितो, कर्तव्यावर प्रेम करायला शिकवितो, मनात जाणिव व सहानुभूती निर्माण करतो.कवयित्रीने पोलिस सेवेतील प्रसंग, कर्तव्याची जाण व त्या अनुषंगाने आलेले बरेच अनुभव काव्यात्मक शैलीत मांडले आहे.

अनेक वेळा विविध आपत्ती व विकासाच्या नावाखाली मानवी जीवनाचं विस्थापन होतं. शासन यंत्रणा त्याचं पुनर्वसन करीत असतं पण त्या अवस्थेतील मानवी मनाची होणारी घालमेल आपल्या शब्दातून मांडतांना व्यवस्थेला पण जाब विचारण्याचं धाडस करणारी कविता वाचतांना पुनर्वासितांच्या मनाचे आंदोलन जाणवते.

‘पूनर्वसन करतांना करता येईल का
आमच्या महत्त्वाच्या
बळी पडलेल्या क्षणाचं
की ह्या भेदरलेल्या मनाचं
पहा जमतय का
नाहीतर,
आहे हेच जगणं ‘…..

ही जगण्याची व्यथा मांडून मानवी जीवनाची वास्तव स्थिती या कर्तव्यपूर्तीचा आनंद हा प्रेरणादायी असतो. हे स्वत : पोलिस सेवेत कार्यरत राहून, अत्यंत चिकित्सक पणे व समाजाभिमुख साहित्य निर्मिती हे मुख्य अंग या संग्रहातून दिसतं.

शब्दगंध प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ छान आहे.ज्यातून धरती व आभाळाचं नातं व त्या नात्यांच्या पलिकडच्या जाणीवांचा शोध घेण्यासाठी पुढे पुढे जाणारं स्त्री मन प्रतित होतं.

सहज गंमत म्हणून कवितेतून ‘ दारु ‘ चे दुष्परीणाम सांगणाऱ्या

‘पोलादालाही वाकविण्याचं
सामर्थ्य असणाऱ्या माणसाला
हिनं पुरतं बधिर केला
खरं हाय मित्रा
दारु इकणाऱ्याने
बांधले असतील इमले,
पिणाऱ्यांन न्हाई
ह्याचा प्रत्यय
मलाबी आला’

या ओळीतून मार्मिक पणे व्यसनावर प्रहार करुन सामाजिक भान देण्याचं शब्दांचं सामर्थ्य समजतं.

‘सेल्फी ‘ ही कविता स्वतःची चमकोगिरी करणाऱ्या राजकीय क्षेत्राला समाजाचं व देशाचं वास्तव चित्रण दिसत नाहीहे सत्य सांगण्याचं कार्य करते.

‘घरात लग्नाची लेक आहे
शेतावर कर्जाचा भार आहे
सीमेवरील जवानांचा श्वास
हरघडीला उधार आहे.
ह्या सेल्फीला
दिसत नाही वास्तव जीवन ‘..

हा काव्यसंग्रह, सिग्नलची गोष्ट, खाकीची व्यथा, शेतातल्या रामकाठची कथा पण सांगतो. दादा कोंडकेंच्या कलेला पण आठवणीच्या रुपाने जपून ठेवतो, मुंबईच्या धकाधकीत आधार वाटणारी लोकल अन शेतकऱ्याच्या कार्याप्रती कृतज्ञ पण होतो.कर्तव्य, संवेदना, जाणिव व जगणं यांचा सुंदर मिलाफ म्हणजे नात्यांच्या पलीकडले हा काव्यसंग्रह आहे.

एकनाथ ल. गोफणे
चाळीसगाव, जि. जळगाव
८२७५७२५४२३

Leave A Reply

Your email address will not be published.