खून असा की, शेजारी झोपलेल्या भावालाही नाही कळालं..!

घरात घुसून १८ वर्षीय तरुणाचा धारधार शस्त्राने खून

0

 

नाशिक

 

नाशिकच्या गंजमाळ परिसरात घरामध्ये झोपलेल्या १८ वर्षांच्या तरुणाची शिताफीने निर्घृण हत्या करण्यात आल्याने नाशिक हादरले आहे. भरवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपी फरार आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पांडू शिंगाडे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घरामध्ये झोपलेल्या पांडूची  घरात घुसून धारदार शास्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना नाशिकच्या गंजमाळमधील पंचशीलनगरमध्ये घडली. पांडू आपल्या मोठ्या भावासोबत घरामध्ये झोपला होता. त्याचवेळी मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच पांडूचा जागीच मृत्यू झाला.

 

पांडूवर हल्ला करून हल्लेखोर फरार झाला. पांडूची हत्या कोणी आणि कशासाठी केली याचे कारण समोर आले नाही. भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत घरात झोपलेल्या तरुणांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत भद्रकाली पोलिस अधिक तपास करत आहे.

 

बहिण घरी आल्यावर घटना उघड

घराजवळ राहणाऱ्या नातेवाईकाच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम करून घरी येऊन पांडू झोपला होता. झोपेत असतानाच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. महत्वाचे म्हणजे पांडूचा मोठा भाऊ त्याच्या शेजारीच झोपला होता. तरी देखील त्याला कळाले नाही. पांडूचा भाऊ दारू पिऊन झोपला होता. सकाळी पांडूची चुलत बहीण घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेचा तपास भद्रकाली पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.