अनैतिक संबंधातुन महिलेची क्रूर हत्या..!

काही तासातच पोलीसांकडून आरोपीस अटक

0

 

जामनेर | लोकशाही न्यूज नेटवर्क 

एक महिना उलटतो न तोच पुन्हा जामनेर तालुक्यास हादरविणारी खुनाची घटना घडल्याने समाजमन सुन्न झाले आहे. तालुक्यातील शहापूर येथील एका विधवा महिलेचा आर्थिक कारणावरून वाद विकोपाला जाऊन महिलेच्या घालत डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली असून मद्यधुंद आरोपीस तळेगांव येथून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची चर्चा मात्र परीसरात सुरू आहे.

 

विधवा महिला संगिता हिचा आरोपी किरण संजय कोळी ऊर्फ लहान्या याच्याशी अनैतिक संबंध होते. दि. १ जुलै रोजी सकाळी १० ते १०:३० वाजेच्या सुमारास किरण कोळी हा अती मद्यधुंद अवस्थेत संगिताच्या घरी आला आणि त्याच्यात व संगिता यांच्यामध्ये आर्थिक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात किरण याने संगिताला मारहाण करायला सुरुवात केली.

 

डोक्यात घातला दगड 

दरम्यान संतापात किरण कोळी याने बाजूला पडलेला मोठा दगड उचलून संगिता हिच्या डोक्यात घालत लाकडी दांडक्याने वार करून खून केला.संगिताचा खून करून मद्यधुंद अवस्थेत आरोपी किरण कोळी हा घटनास्थळा वरून पसार झाला होता.घटनेची माहिती स्थानिकांनी जामनेर पोलीसांनी दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून आरोपीचा अवघ्या काही तासात शोध घेत आरोपी किरण कोळी ऊर्फ लहान्या यास तळेगांव येथून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.अनैतिक संबंधातून हि हत्या झाल्याची परिसरातील नागरिकांतून चर्चा सुरू होती.

 

चर्चांना उत..

विधवा महिलेची हत्या नेमकी कश्यामुळे झाली.?आर्थिक कारणावरून की, अनैतिक संबंधातून.?की अन्य काही कारणावरून.? आरोपी हा एकटाच होता की की त्याच्या सोबत अजून कोणी होते.? हा विषयाचा शहापूर व तळेगाव भागात चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणी घटनेचा पोलीस शोध घेत आहेत.

महिलेचा मृतदेह शव विच्छेदनासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. अवघ्या काही तासांतच खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस अटक केल्याने पोलीसांचे कौतुक केले जात आहे. सदर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दिपक रोटे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.