रावेर शेतकऱ्यांसाठी निसर्गाचा जणू शापच..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

‘नेमेची येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे रावेर तालुक्याच्या नशिबाने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाळ्यात तसेच इतर मौसमात अवकाळी वादळ, वारा आणि पावसाचा तडाका शेतकऱ्यांसाठी काळ ठरला आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. परवा शनिवारी वादळाच्या तडाख्याने रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यावधीची केळी जमीन दोस्त झाली. वादळामुळे आणि अन्य पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली. रावेर तालुक्यातील तांदुळवाडी, बलवाडी, सिंगर, मंगलवाडी, खिरोदा, सहस्त्रलिंग येथील सुमारे २५५ घरांची पडझड झाली असल्याचा महसूल खात्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचबरोबर एकूण ७०४ शेतकऱ्यांच्या ६०२ हेक्टर मधील उभी केळी जमीनदोस्त झाली. ही माहिती स्वतःनायब तहसिलदारांनी दिली आहे. त्यामुळे फुगवून केलेली ही आकडेवारी नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी म्हणून रावेरचे आमदार शिरीष दादा चौधरी हे शासकीय पाठपुरावा करीत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळेल म्हणून शासकीय मदतीच्या संदर्भात आर्थिक मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात पडल्याशिवाय खरे नाही. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मानसिक स्थितीचा विचार महत्त्वाचा आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. दररोजचे तापमान ४५ अंशावर जात आहे. दुपारच्या वेळी रस्त्यावर अघोषित संचारबंदी सदृश्य परिस्थिती आहे. उष्माघाताने काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून शासनाने सूचना वजा आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात १४४ लागू करून अत्यंत महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पशुधनाच्या चाऱ्यांबरोबरच त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्षाला तोंड द्यावे लागत आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे उष्णतेच्या लाटेमुळे तीव्र उष्माघाताच्या झटक्याने सुमारे १०० शेळ्या जागीच मृत्युमुखी पडलया आहेत. मुक्या प्राण्यांना तहान लागली, भूक लागली, उन्हाचा तडाखा बसतोय हे सांगता येत नाही. प्राणी आगीत होरपळून मृत्युमुखी पडण्याच्या घटना आपण अनेक वेळा ऐकतो, परंतु तीव्र उष्णतेच्या तडाख्याने १०० शेळ्यांचा एकाच वेळी मृत्युमुखी पडतात, हे कसले दुर्दैवी. आज पशुधनाचे जतन करता करता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत. त्यातच १०० शेळ्या मृत्युमुखी पडल्या तर पशुधनाच्या पालन करणाऱ्यांची स्थिती काय झाली असेल, याची कल्पनाच करवत नाही. एकंदरीत निसर्गापुढे विज्ञानासह कोणाचे काही चालत नाही. निसर्गावर मात करणे शक्य नाही सिद्ध झाले आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी निसर्गाच्या कोपाचा अनुभव नवीन नाही. उष्णतेच्या लाटेशी सामना तर नेहमीचाच आहे. परंतु अचानक थोडेसे वादळ आले आणि त्यांने यावल तालुक्यातील आदिवासी भागातील अंबापानी या गावातील एक घर जमीन दोस्त होऊन त्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा ढिगाराखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या राज्यात वादळी वाऱ्याने घर कोसळून अख्या कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू होतो, ही कल्पनाच मनाला वेदना देणारी आहे. प्रत्येकाला पक्के घर शासनातर्फे देण्यात येईल, हे फक्त कागदावरच आहे असे म्हणता येईल. शहरांमध्ये पावसाळ्यापूर्वी प्रशासनातर्फे सूचना देऊन जुन्या पडक्या घरांची डागडूजी करण्याच्या सूचना दिल्या जातात. तसेच अत्यंत जुने घर असेल तर ते घर रिकामे करण्याच्या सूचना देऊन तेथील रहिवाशांना दुसरीकडे सुरक्षित स्थळी हलविण्यात येते. आता आदिवासी भागातील कुटुंबावर जे अचानक वादळी वारा, पावसाचे संकट कोसळले त्याला कोण जबाबदार? त्यामुळे निसर्गाशी सामना करण्यासाठीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. आधीच शेतीच्या नापिकीमुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यात निसर्ग कृपामुळे शेतकऱ्यांचे ता तोंडाशी आलेला घास जर हिरावून घेतला जात असेल तर शेतकऱ्यांपुढे उभे राहणाऱ्या या संकटाचा सामना करण्यातच शेतकऱ्यांचे खच्चीकरण होते. त्यामुळे निसर्गाच्या या कोपाच्या संदर्भात वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यास होण्याची आता नितांत गरज आहे. अन्यथा कोणत्या वेळेला काय संकट येईल? ही भीती शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसेल…!

Leave A Reply

Your email address will not be published.