भुसावळात स्व. निखील खडसे स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

मैदाने व मोकळ्या जागांची आता सिमेंटची जंगले होत असल्याने श्वास कोंडला जात आहे. पर्यावरण समतोल राखण्याकरीता सुद्धा मैदानांची आवश्यकता असते. कारण शारीरिक आरोग्य जपण्यात मैदानी खेळांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. खिलाडू वृत्तीने खेळ खेळणे गरजेचे असते. त्यासाठी खिळाडूवृत्ती वाढवली पाहिजे. खेळ स्पर्धा यासाठीच असतात. त्यामुळे दृष्टिकोन बदलतो. सकारात्मक भावना निर्माण होतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील डि.एस. हायस्कूलचे ग्राऊंडची (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान) यापुढील काम होत राहतील तसेच या मैदानावर भविष्यात पोलिस भरतीसह इतर विविध खेळाच्या स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात येतील, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी येथे केले.

शहरातील आरपीडी रस्त्यालगतच्या मैदानावर बुधवार दि. 9 पासून स्व. निखील खडसे स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी खडसे बोलत होते. अनिकेत पाटील व मित्र परिवारातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ टॉसने करण्यात आला. प्रसंगी हवेत फुगे सोडण्यात आले व श्रीफळ वाढवण्यात आले.

यावेळी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खेवलकर खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे, बुटासिंग चितोडिया, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश नेमाडे, प्रमोद नेमाडे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, शहरचे निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड, माजी नगरसेवक प्रा. सुनील नेवे, आयोजक अनिकेत पाटील, अ‍ॅड. बोधराज चौधरी, सुनील महाजन, देवा वाणी, दिनेश नेमाडे, रमेश मकासरे, लक्ष्मी मकासरे, कोलते, पालिका अभियंता बाविस्कर, पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. तौसीफ खान, सचिन पाटिल आदींची उपस्थिती होती. प्रसंगी स्व. निखिल खडसे यांच्या प्रतिमेस रोहिणी खेवलकर व मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

पुस्तक भेट देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धेमध्ये राज्यासह परराज्यातील 32 संघ सहभागी झाले आहेत. माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी मनोगत व्यक्त करीत स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

हक्काचे मैदान – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक मैदानाचे स्वरूप व चेहरामोहरा पूर्णत: बदलला असून भुसावळकरांना एक चांगली भेट मिळाली आहे. पूर्वीच्या बकाल मैदानाने कात टाकल्याने आता शहरातील क्रीडाप्रेमी, खेळाडू यांच्यासह ज्येष्ठ नागरिक यांना सुरक्षित व हक्काचे मैदान मिळाल्याने शहरवासियानी आनंद व्यक्त केला आहे.

समारोपास मो. अझरुद्दीन उपस्थित राहणार – भव्य क्रिकेट स्पर्धा 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान होणार असून 13 रोजी स्पर्धेचा समारोप होईल. या कार्यक्रमास भारतीय संघाचे माजी कप्तान मो.अझरूद्दीन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, प्रत्येक दिवशी सात मॅचेस होतील व एक मॅच सहा ओव्हरची असेल तर 13 रोजी सकाळी 10 वाजता सेमी फायनल व फायनल सामना होईल. हा सामना आठ ओव्हर (षटकांचा) असेल तर दुपारी तीन वाजता विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येईल.

समाजांमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी –  खडसे
कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे व्यापक पडसाद उमटत असून याप्रकरणी सर्वांनी संयम ठेवण्याची गरज आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाची वाट बघावी. समाजांमध्ये तेढ निर्माण होणार नाही, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. कर्नाटक सरकारने शाळांमध्ये मुस्लिम युवती विद्यार्थिनी यांनी हिजाब (बुरखा) घालू नये. ही गोष्ट खेदजनक आहे. (बुरखा) हिजाब घालणे हा मुस्लिम समाजातील महिलांचा आधार आहे. या घटनेचे पडसाद महाराष्टासह संपूर्ण देशात पडत आहे. याकरिता समाजांमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भुसावळात आयोजित क्रिकेट स्पर्धेप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.