लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली, एम्स रुग्णालयात दाखल

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली असून त्यांना राजधानी दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांच्या निगराणीत

मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या वयोमानानुसार होणाऱ्या प्रकृतीच्या समस्यांमुळे आडवाणी यांना बुधवारी रात्री एम्समध्ये दाखल करण्यात आले. सध्या एम्समधील जेरियाट्रिक विभागातील डॉक्टराच्या निरीक्षणाखाली लालकृष्ण आडवाणी यांना ठेवण्यात आले आहे. त्यांना रूटीन चेकअपसाठी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

भारतरत्न प्रदान

याच वर्षी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारनं देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच, भारतरत्न प्रदान करून सन्मानित केले होते. 30 मार्च रोजी त्यांना हा नागरी सन्मान जाहीर झाला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू हे देखील उपस्थित होते. तर यापूर्वी 2015 मध्ये अडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण हा देऊन सन्मानित करण्यात आलं.

राममंदिर आंदोलनातील प्रमुख

लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील कराची येथे झाला. राममंदिर आंदोलनातील प्रमुख नेत्यांमध्ये गणना होणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आडवाणींनी आपली राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) माध्यमातून सुरू केली. भारतीय जनता पक्षाची (भाजप) पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे.

 

तीन वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

आडवाणी हे तीन वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 1986 मध्ये ते पहिल्यांदा पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1990 पर्यंत ते या पदावर राहिले. यानंतर 1993 मध्ये अडवाणी पक्षाचे अध्यक्ष झाले आणि 1998 पर्यंत ते या पदावर राहिले. ते 2004 मध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या वेळी अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि 2005 पर्यंत या पदावर राहिले.

देशाचे सातवे उप-पंतप्रधान होते

50 वर्षांहून अधिक काळ असलेल्या त्यांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीत, आडवाणी हे 1998 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये गृहमंत्री बनले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते गृहमंत्री होते आणि त्यानंतर 2002 साली त्यांना देशाचे उपपंतप्रधान बनवण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.