दोन वर्षांचा वनवास संपला;कर्नाटक एस.टी.ने ओलांडली महाराष्ट्राची हद्द

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

कोल्हापूर

 

गडहिंग्लज: कर्नाटक एस.टी.ने ओलांडली महाराष्ट्राची हद्द . कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेल्या संकेश्वर आगाराच्या ‘संकेश्वर-गडहिंग्लज-संकेश्वर’ बसफेऱ्या रविवार (१३) पासून सुरू झाल्या. हिटणी नाक्यापर्यंत येऊन माघारी फिरणाऱ्या बसेस गडहिंग्लज आगारापर्यंत ये-जा करायला सुरुवात झाली. त्यामुळे सीमाभागातील प्रवासी, रुग्ण, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार मंडळी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र व कर्नाटकला जोडणारा गडहिंग्लज-संकेश्वर हा मुख्य राज्यमार्ग आहे. त्यामुळे गडहिंग्लज व संकेश्वर आगाराकडून मोठ्या प्रमाणात बससेवा या मार्गावर सोडल्या जातात. संकेश्वर आगाराने सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग म्हणून या मार्गाला ‘गोल्डन मार्ग’ असे नाव दिले आहे.

गोवा व कोकणात जाण्यासाठीही हा जवळचा मार्ग आहे. या मार्गावर पर्यटकांची वर्दळही माठी आहे. तसेच औरनाळ, दुंडगे, हसूरचंपू, माद्याळ, जरळी, हेब्बाळ, निलजी, मुत्नाळ व हिटणी ही मोठी गावे याच मार्गावर आहेत. त्यामुळे या गावांतील दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने एसटीला चांगले उत्पन्न मिळते.

२३ मार्च, २०२० पासून कोरोनामुळे महाराष्ट्र व कर्नाटकची हद्द संपणाऱ्या हिटणी नाक्यापर्यंतच दोन्ही आगाराच्या बसेस धावत होत्या. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसण्याबरोबरच वेळेचा अपव्यय होत होता. गडहिंग्लज व संकेश्वर दोन्ही आगारांच्या बसफेऱ्या नियमितपणे सुरू झाल्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.

निलजीकरांनी वाटले पेढे

गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावरील बसफेऱ्या पूर्ववत सुरू झाल्यामुळे निलजी ग्रामस्थांनी बसचे वाहक, चालक व प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

दररोज लाखाचे उत्पन्न

गडहिंग्लज व संकेश्वर आगाराच्या प्रमुखांनी एकमेकांशी संपर्क साधून या बसफेऱ्या सुरू केल्या. दोन्ही आगारांना या मार्गावर दररोज प्रत्येकी सुमारे ५० हजाराचे उत्पन्न मिळते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.