लक्ष्मी पुजनासाठी केरसुणीची ग्रामीण भागात वाढती मागणी

0

लोकशाही न्युज नेटवर्क (गोकुळ कोळी)

मनवेल ता. यावल 

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी घरात नवी केरसुणी विकत घेतली जाते. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. घरातील केरकचरा काढल्यावर घराचे पावित्र्य टिकून राहते. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जात असल्यामुळे ग्रामीण भागात केरसुणीला वाढती मागणी आहे.

लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तसेच व्यापारी लोकांचे हिशेबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.

लक्ष्मी व केरसुणी यांचा संबंध

केरसुणीला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो असे समजून आपण केरसुणीच्या लगेच पाया पडतो. कचरा हे घरातील दारिद्र्य आहे, केरसुणी ही घरातील कचरा रूपातले दारिद्रय़ साफ करते. ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मीचा अधिवास असतो. त्याच घरात सुखशांती राहते. याउलट जेथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते. तेथे नेहमी पैशाची चणचण भासते. म्हणून घर नेहमी निटनेटके, आवरलेले आणि स्वच्छ ठेवावे. म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते. केरसुणीचे काम झाल्यावर त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. तसेच त्या केरसुणीला कोणाचा पाय लागणार नाही याचीही काळजी घ्यावी. चुकून केरसुणीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमायाचना करावी. केरसुणी कधीही उभी ठेवू नये. घरात नवीन केरसुणी आणल्यावर त्याला आधी हळद-कुंकू लावावे. तसेच शक्यतो शनिवारच्या दिवशी नवी केरसुणी वापरायला काढावी. घरात पैशाची कमी भासणार नाही अशी श्रध्दा कायम दिसुन येते.

Leave A Reply

Your email address will not be published.