दासा मनी आठव वीसरेना I तुजवीण रामा मज कंठवेना II

0

🏵️ करुणाष्टक -34🏵️

आम्हां अनाथांसि तूं एक दाता | संसारचिंता चुकवीं समर्था ||
दासा मनीं आठव वीसरेना | तुजवीण रामा मज कंठवेना ||

उत्तम उच्चशिक्षण आहे, मानसन्मान आहे, पैसा प्रतिष्ठा आहे तरी जीव हा ‘दरिद्री’च राहतो. संत सद्गुरू त्या दरिद्री जीवाला न्रुपवंत करतात, अलंकृत करतात. भगवंताजवळ जे ऐश्वर्यसंपन्न गुण आहेत त्यातील थोडे जरी त्यांने आपल्याला औदार्याने बहाल केले तर आपलं आयुष्य ही उजळून निघते. दैवी गुणसंपदा आपल्या प्रयत्नांनी मिळवायचा प्रयत्न केला तरी जीवन धन्य होऊ शकते. आपले संकल्प विकल्प टाकून देऊन जीव ‘ब्रह्मरूप’ झाला की खरी सार्थकता लाभते. पण हे सार होण्यासाठी प्रभूप्रेमानं आपले जीवन व्याप्त लागतं. एकदा का समर्थ सद्गुरु व रामराया आपल्या पाठीशी आहे हे नक्की झाल्यावर इतरांचा आधार कोण कशास मागेल? ज्ञानोबा माऊली ही म्हणते,
” सद्गुरु सारिखा असता पाठीराखा I इतरांची लेखा कोण करी?”
राजाची पत्नी कधी भीक मागेल काय? तिच्याकडे आपोआप सर्व सिद्धी येतात. प्रभूची कृपा झाली तर ‘अष्टमहासिद्धी’ दारात लोळण घेतात. सद्गुरूच महात्म्य वर्णिताना, “ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो”. असंच म्हंटलं आहे. तो अनाथांना सनाथ करतो.सर्वांचा ‘वाली’ होतो. पालनकर्ता रक्षणकर्ता तोच असतो. ‘श्रीराम’ आपला दाता आहे हा विश्वास असतो. तेव्हा असं म्हणतात ‘आम्ही काय कुणाचे खातो? हा राम आम्हाला देतो’. राम हा सुखाचा दाता आहे. कल्पवृक्ष आहे. म्हणून तर गोंदवलेकर महाराज प्रार्थनेत म्हणतात,” दाता राम सुखाचा I संसार मान तू प्रभू सेवा हाचि सुबोध गुरूंचा I संतोष सर्वदा मनी ठेवा I

संसार “प्रभुसेवा” म्हणून केला तर त्याच फल खूप मोठ मिळतं. साऱ्या भक्तांनी असंच केलं. म्हणून तर जनाबाईला प्रत्यक्ष विठ्ठल येऊन जात्यावर दळण दळण्यास मदत करे. ‘येता देवाजीच्या मना Iतेथे कोणाचे चालेना I ‘देवानं, प्रभूनं एकदा आपलंसं केलं तर काय कमी? संत तुकाराम महाराज बोलून जातात, “काय उणे आम्हा पांडूरंगापायी?” ह्या पांडुरंगाच्या चरणाशी आम्हाला काय कमी आहे ? प्रभूचा, सद्गुरुचा आश्रय जर असेल, तर आडमार्गाला पाऊल पडत नाही. आपलं ब्रीद तो करूणादाता कधी सोडत नाही. म्हणून त्याच्या अनन्य आश्रयास पात्र होणं एवढंच आपल्या हातात राहते.

पण या आड काय येते तर आपल्या ‘संसारचिंता’ आपल्या प्रपंचाचा आरंभच होतो ‘मी’या देह कल्पनेपासून. ‘माझे माझे’ या कल्पनेचे क्षेत्र आपण वाढविता नेतो. ‘मी’ चे घट्ट होणे व ‘माझे’ चा विस्तार हे पूरक आहेत व त्याचे माध्यम ‘लोभ’आहे. कंस वधापूर्वी गोकुळ सोडल्यानंतर भगवान पुन्हा गोकुळात परत गेले नाहीत. हे प्रेम उदात्त प्रेम होय. लोभाचे बंधन नाहीसे केले व परमेश्वराचे चिंतन सतत, निरपेक्ष, उत्कटतेने केले तर ‘संसार चिंता’ कमी होतात. यासाठी संतांचा सहवास उपयुक्त ठरतो. ‘माझे’, स्त्री -पुत्र, आप्तमित्र, घर, संपत्ती ,ऐश्वर्य ,सत्ता, मानसन्मान, प्रतिष्ठा, लौकीक या स्वरूपात विस्तारत जाते,तेच जन्ममृत्यूच्या फेर्‍यात गोवते. अनेक प्रकारच्या दुःखाला आणि आपत्तीला कारणीभूत होते.सर्व जीवन चिंतेने व्याकूळ करून सोडते. या ‘माझे माझे’ च्या ठिकाणी व्यवहारात उपयोगी काही अंश असले तरी तत्वतः विचार करता ‘माझे माझे’ वाटणे ही शेवटी भ्रांती आहे. या भ्रांतीचे प्रयत्नपूर्वक निरसन केले पाहिजे. तरच जन्माला लागलेली सर्व प्रकारची चिंता, आयुष्यात वाट्याला येणारे क्लेश नाहीसे होतील. स्त्री-पुत्रादीच्या ठिकाणी उत्कंठेने असलेले ममत्त्व हा शेवटी भ्रम आहे.त्याची उपयुक्तता व आवश्यकता व्यवहाराच्या मर्यादेत ठेवली पाहिजे.ती आसक्तीत परिणीत झाली तर बाधक ठरते.ही सारी समज आपल्याला संत मंडळी देतात.

‘धन,सुत,दारा असू दे पसारा I नको देऊ थारा आसक्ती ते I’ असं ते आवर्जून सांगत आहे.ते सारे देवाचा आहे असा भाव ठेवला तर उद्वेग,चिंता, काळजीचं कारण राहात नाही. अशी सद्बुद्धी आपल्याला लाभावी ह्यासाठी पुन: त्या ‘विश्वंभरा’ कडेच मागणं मागावं लागतं. समर्थ ही म्हणतात हे रघुराया, समर्था तूच आमची संसारचिंता चुकव. आम्हाला आनंदधन, आनंदस्वरुप अशा ‘ईश’ तत्वाची ओळख करून दे. तुझ्या या दासाच्या मनात तुझे स्मरण अखंड आहे. हे समर्था, आमची संसार चिंता नाहीशी कर. तुझ्या या प्रीतीमुळे,मी तुझ्या विना जीवन कंठत नाही. समर्थांनी करुणाष्टकातून,मनाच्या श्लोकातून “सर्वोत्तमाचा दास’हे विशेषण पुन्हा पुन्हा वापरले आहे. ते औचित्याचे व समर्थक असे आहे. समर्थ भक्त, संत, महात्मा ,योगी ,सिद्ध अशी विशेषणं न वापरता दास म्हणतात, सर्वोत्तमाचा दास म्हणतात. नाहीतर थोड्याशा सिद्धी प्राप्त असलेले किंवा लोकांना आकर्षून घेईल असे वकृत्व असलेले या मार्गातले तथाकथित महंत स्वतःला परमेश्वर, ब्रह्मरूप, भगवान ,सच्चिदानंद इत्यादी इत्यादी म्हणून घेत असतात व तीच भूषणे, बिरुदे मिरवीत असतात. त्यांच्या त्या अहंकाराला थारा मिळू नये म्हणून समर्थांनी दास शब्दाची योजना केली आहे.अहंकार हा अज्ञानापेक्षा ज्ञान्याच्याच मागे हात धुऊन लागतो, अगदी गळ्यात पडतो असे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले आहे. त्या अहंकाराला बळ मिळू नये म्हणून दास शब्द वापरला. समर्थ म्हणतात हा दास तुझे स्मरण अखंड कंठीत आहे.अशा दासाचे तू कल्याण कर.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड , पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.