करण पवारांच्या समोर अडचणींचा डोंगर !

भाडोत्री कार्यकर्तेही सोडू लागले साथ : पारोळ्यात केवळ दहशतीचे राजकारण

0

जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानक जिल्ह्यातील राजकारणात करण पवार नाव चर्चेत आले. भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यासाठी शिवसेना (उबाठा) गटाकडे सक्षम उमेदवार नसल्याने माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करण पवार यांना पुढे करण्यात आले असले तरी आता त्यांच्या समोरील अडचणी वाढतच जात आहेत. नवखे असलेले करण पवार ज्या शिवसैनिकांच्या बळावर ‘उड्या’ मारत होते, ते कार्यकर्तेही ‘हात’ सोडून जात आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) गट कुठेही सक्रिय दिसून आला नाही व येत्या दोन दिवसात सक्रिय होण्याची चिन्हे देखील नाहीत. ज्या पारोळ्यातून करण पवार यांनी राजकारणाला सुरुवात केली तेथेही त्यांनी केवळ दहशतीच्या बळावरच राजकारणाचा कित्ता गिरविला आहे.

पारोळा विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून पवार (पाटील) परिवराच्या ताब्यात होता; मात्र या मतदारसंघात त्यांना विकास साधता आला नाही. पवार कुटूंबांचे होमपिच असलेल्या तामसवाडी धरणाचा दाखला दिला जात असला तरी त्यासाठी राज्यपातळीवरुन प्रयत्न झालेले आहेत हे न समजण्याइतपत जनता खुळी राहिलेले नाही. सत्तेसाठी करण पवार यांनी काका माजी मंत्री डॉ. सतिष पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसत भाजपच्या बळावर नगराध्यक्ष पदही उपभोगले, तेही स्वार्थासाठीच! घरात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असतांनाही त्या पदाला न्याय देण्यात ते कमी पडले आहेत. जनतेच्या समोर हे सारे विषय असल्याने करण पवार यांच्यासाठी हे विषय अडचणीचे ठरणार आहेत.

कुठे आहेत शिवसैनिक?
शिवसेना (उबाठा) गटाने आयात असलेल्या करण पवार यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. पक्षाकडे उमेदवार असतांनाही केवळ माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या सांगण्यावरुन करण पवार यांना पुढे करण्यात आल्याने खरा शिवसैनिक दुखावला असून तो प्रचारातून गायब झालेला दिसून आला. काही कार्यकर्त्यांना आमिष देवून प्रचारात सहभागी होण्याचे सांगण्यात आले मात्र आता पितळ उघडे पडू लागल्याने त्या कार्यकर्त्यांनीही साथ सोडली आहे.

कुठे होते करण पवार?
जे करण पवार आज गद्दारी, मतलबी, संधीसाधू असे वाक्य वापरुन भाजपवर टीका करीत आहेत, त्या करण पवारांनी नगराध्यक्षपद उपभोगल्यानंतर मतदारसंघासाठी सोडा पारोळा शहरासाठी काय केले? लोकसभा निवडणुकीच्या हंगामात अचानक ते समोर आले आणि आता विकासाच्या गप्पा ठोकू लागले आहेत. आजपर्यंत केवळ स्वार्थाला साथ देणाऱ्या करण पवार यांना विकासाचा पुळका कसा आला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.