JDCC बँक निवडणूक; उद्या होणार मतदान

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. या निवडणुकीत ११ जागांसाठी उद्या दि. २१ रोजी सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शेतकरी विकास पॅनलच्या विरुद्ध महाविकास आघाडी सहकार पॅनल दरम्यान  ही निवडणूक होणार आहे.  तर सोमवार दि. २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार  आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक असल्याने यात कोणतेही राजकारण नको म्हणून सर्वपक्षीय पॅनल तयार करून ही निवडणूक लढवली जाणार होती; यासंदर्भात बैठकी होवून जागा देखील वाटप करण्यात आल्या. मात्र  शेवटच्या क्षणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं भाजपसोबत निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानं भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असं चित्र निर्माण झालं.

जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेसच्या काही उमेदवारांनी व भाजपच्या काही उमेदवारांनी मिळून शेतकरी विकस पॅनल तयार केले असून, महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलसमोर आव्हान उभं केलं आहे. शेतकरी विकासाच्या काही उमेदवारांनी जाहीर माघार घेतल्याने काही जागांवर औपचारिक लढत शकते, मात्र महिला राखीव, इतर संस्था मतदार संघ, ओबीसी मतदार संघ यासह काही सोसायटी मतदार संघामध्ये लढत होण्याची शक्यता आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत एकूण २१ जागा असून त्यापैकी बिनविरोध झालेल्या ११ जागा आहेत. तर १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या १० संचालकांच्या निवडणूकीसाठी ४२ उमेदवार सोसायटी व अन्य मतदार संघातून निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत  एकूण २८५३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजवणार आहेत. हे मतदान जिल्ह्यातील १५ केंद्रांवर होणार असून या मतदानासाठी १०५  सहकार क्षेत्रातील प्रशासन आणि लेखा परीक्षण विभाग, ३० राखीव आणि ५ झोनल कर्मचारी, असे १४० कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहेत.

मतदान केंद्रावर कोरोनाविषयक सर्व नियम आणि अटींचे पालन करणे तसेच मतदाराने आपले ओळखपत्र सोबत ठेवावे तसेच यावेळी कोणतीही अडचण आल्यास ९०११११२६२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन निवडणूक अधिकारी बिडवाई यांनी केले आहे.

निवडणूक रिंगणात असलेल्या सहकार व शेतकरी पॅनल मधील ४२ उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.