जळगाव जिल्ह्यासाठी आता मंत्र्यांची चौकडी..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव जिल्ह्यासाठी महाराष्ट्राचे तीन कॅबिनेट मंत्री आतापर्यंत कार्यरत होते. जिल्ह्याचे भाग्य आणखी उजळले असून त्यात भर म्हणून रावेर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांच्याकडे ‘युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्र्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. एवढे चार मंत्री एका जिल्ह्याचे असल्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचा कायापालट होईल ही जळगाव जिल्हा वासियांची खूप मोठी अपेक्षा आहे, आणि यात गैर काही नाही, असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले तीन दिग्गज कॅबिनेट मंत्री जळगाव जिल्ह्याचेच आहेत. भाजपचे संकट मोचक म्हटले जाणारे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात समजले जातात. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत. तर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासातील समजले जातात. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी एखादी योजना खेचून आणणे या तिघांना सहज शक्य आहे. त्यातच आता दुधात साखर म्हणजे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रक्षाताई खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला राज्यमंत्री म्हणून समावेश हा होय.

राज्य आणि केंद्रातील डबल इंजिन सरकारचा खराखुरा फायदा आता जिल्ह्यासाठी सहज होणे शक्य आहे. अर्थात राज्यासाठी एखाद्या विकास कामांसाठी केंद्रातील निधी हवा असेल, तर केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसेंच्या रुपयाने तो निधी सहज उपलब्ध होणे शक्य आहे. त्यामुळे सर्वप्रथम केंद्रीय मंत्रिमंडळात वीस वर्षानंतर जळगाव जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळाल्याबद्दल रक्षाताई खडसे यांचे जळगाव जिल्ह्याच्या वतीने खास अभिनंदन आणि त्यांचे हार्दिक स्वागत. रक्षाताई खडसे यांना भाजपतर्फे रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन त्यांच्यावर भाजप श्रेष्ठींनी विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला त्या पात्र देखील ठरल्या. महाराष्ट्रात भाजपची वाताहत झाली असताना जळगाव जिल्ह्यात मात्र दोन्ही मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे जळगाव जिल्हा हा भाजपचा गड कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. याबद्दल दोन्ही उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन..

रक्षाताई खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यासाठी आता चार मंत्री मिळाले. हे जळगाव जिल्ह्याचे आणि जळगाव जिल्हा वासियांचे भाग्यच म्हणावे लागेल. रक्षाताई खडसे यांना उमेदवारी मिळाल्यापासून ते त्यांच्या निवडणुकीतील प्रचारासंदर्भात विविध प्रकारे टीकाटिप्पणी होत होती. त्यांना मिळालेली उमेदवारी रद्द झाली पाहिजे, यासाठी भाजपच्या एका गटाने प्रदर्शनही केले होते. भाजपमधील गटबाजीचे प्रदर्शन करण्यात कोणकोण अग्रभागी होते त्यांची कल्पना जिल्ह्याला होती. तथापि निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली नसल्याने अशा बाबी प्रत्येकच पक्षात होत असतात. परंतु भाजप सारख्या शिस्त पाळणाऱ्या पक्षातून असे होणे अपेक्षित नव्हते. याबाबत माध्यमांमध्ये सुद्धा वाचा फुटली. तथापि आता ‘झाले गेले गंगेला मिळाले’. जिल्ह्यासाठी या चारही मंत्र्यांनी एक दिलाने काम करून जिल्ह्याच्या नकाशावर जळगाव जिल्ह्याचे स्थान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत हीच अपेक्षा आहे.

चारही मंत्र्यांनी आरोप प्रत्यारोप करणे टाळले तर जिल्ह्याच्या विकासाचा अजेंडा पूर्ण होणे काही अवघड नाही. अमळनेर तालुक्यातील ‘निम्न तापी प्रकल्प’ अर्थात ‘पाडळसरे धरण’ निधी अभावी गेले पंचवीस वर्षापासून रखडलेले आहे. त्याच्या पूर्णत्वासाठी चारही मंत्रांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. केंद्राचा निधी मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसेंची आता मदत होणार आहे. त्याचप्रमाणे ‘बोदवड उपसा सिंचन प्रकल्प’ योजनेच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न होऊन लवकरात लवकर ही योजना पूर्ण झाली पाहिजे. गिरणा नदीतील ‘सात बलून बंधाऱ्यांची योजना’ मंजूर होऊन कागदावरच राहिली आहे. या महत्त्वाकांक्षी बंधाऱ्यांच्या कामाला प्रत्यक्ष चालला मिळावी ही अपेक्षा. जिल्ह्यातील सिंचनचा आणखी एक प्रकल्प म्हणजे ‘मेघा रिचार्ज’ प्रकल्पाला निधी मिळवून त्याच्या कामाला सुरुवात व्हावी. हातनुर धरणाच्या विकासासाठी मंजूर झालेल्या दरवाजांचे काम का सुरू होत नाही? ते दरवाजाचे पूर्ण झाल्याशिवाय धरणातील पाण्याचा साठा वाढणार नाही. कारण धरणात गाळ साचला आहे. वाघूर धरणाचे काम पूर्ण झाले असले तरी बंदिस्त पाईपलाईन द्वारे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणीपुरवठा करण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. ते व्हावे हीच अपेक्षा.

जळगाव शहर हे औद्योगिक दृष्ट्या सोयीचे असताना तेथील एमआयडीसीचा विकास का होत नाही ? जळगाव एमआयडीसीमध्ये २५० हेक्टर जमीन पडून आहे. त्याचा विकास करून तेथे नवे उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. ते होत नाही. त्यासाठी आता चारही मंत्र्यांनी प्रयत्न केले पाहिजे. या प्रमुख प्रलंबित विकास प्रकल्पांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे. त्यासाठी या चारही जिल्ह्यातील नेत्यांनी प्रयत्न करून जिल्हा सुजलाम सुफलाम करावा हीच जिल्हावासीयांची अपेक्षा आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.