जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ऐतिहासिक स्नेहसंमेलन सोहळा बुधवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी शाळेच्या पटांगणावर अभूतपुर्व आनंदाच्या उत्साहात संपन्न झाला.
१९९०-९१ ते २०००-०१ या ११ वर्षांतील जि. प. विद्यानिकेतन विद्यालयात दहावीमधे शिक्षण घेतलेले शेकडो मित्र-मैत्रीणी एकत्र जमल्यामुळे हा ऐतिहासिक सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह, धुळे, नागपुर, मालेगाव, नाशिक, मुंबई, पुणे, संभाजीनगर तसेच परराज्यातिल माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच शिक्षक-शिक्षिका या सोहळ्यास उपस्थित होते.
“एक दिवस पुन्हा भरवुया शाळा” या ब्रिद वाक्यानुसार सकाळी १० वाजता सर्व आजी-माजी शिक्षकवृंंदांचे पुष्पवर्षाव करत औक्षण करुन जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जि. प. विद्यानिकेतनचे माजी प्राचार्य श्री. पी. बी. चौधरी सर तर उद्घाटक विद्यमान प्राचार्य सौ. सुनिता गरुड यांचेसह सर्व आजी-माजी शिक्षक व्यासपिठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी दिवंगत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच दिवंगत विद्यार्थी यांना श्रंध्दांजली अर्पण करुन दिपप्रज्वलन तथा महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. नंतर पी. एन. पवार सरांसोबत सर्व उपस्थितांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करुन कार्यक्रमला सुरुवात करण्यात आली. ईश्र्वर वाघ व उल्हास ठाकरे सरांनी स्वागत गीत सादर केले.
यादरम्यान नेहमीप्रमाणे एस.बी.महाले सरांंनी मैदानावर सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींचे वार्मअप करत राष्ट्रगीत व प्रार्थना घेवुन रांगेत सर्व विद्यार्थी आपआपल्या वर्गात गेले. त्यानंतर शिक्षकांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे दिले. अशा ३ तासीका घेण्यात आल्या. सर्व विद्यार्थी गणेवशात व दप्तरासह आले होते. तद्नंतर आजी-माजी शिक्षिका/शिक्षकांचा मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देवुन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. सोबतच तत्कालीन मैदानावर मटकी, गोला व पुस्तक विक्रते यांचाही सत्कार करण्यात आला.
शाळेच्या स्थापनेपासून 110 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा ऐतिहासिक स्नेह मेळावा झाल्याचे प्रतिपादन यावेळी मा. प्राचार्य चौधरी सरांनी केलं यावेळी ए. बी. गायकवाड, एस. एम. नेतकर, जी. आर. मराठे, या आजी-माजी शिक्षकांनी मार्गदनपर भाषण केले. तर विद्यार्थ्यांच्या वतीने गजानन चौधरी, योगीता करंदीकर, दुर्गेश चौधरी, दिपक सोनार, महेश येवले, ललित गायकवाड, किरण चाटे, मनोज दुसाने, सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक समाधान सोनवणे, सुत्रसंचलन चंद्रकांत शिवाजी कानडे, आभार ओमप्रकाश कोळी या विद्यार्थ्यांनी केले. तर कार्यक्रमाच्या नियोजनात यशवंतराव मोरे, एस. वाय. पाटील, डी. आर. देवरे सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी निलेश भावसार, विशाल लिंगायत, देवेंद्र हरदे, अतुल भालेराव, क्रांती भावसार, नितीन सोनवणे, श्रीकांत सोले, संजय पाटील, सुरेश फालक, पप्पु तायडे, किरण तडवी, संधिपाल वानखेडे तथा माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.