जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
समाजसेविका व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष मनिषा पाटील यांनी आपल्या नातीचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी तालुका जामनेर येथील टाकळी खुर्द अंगणवाडीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना वाढदिवसाच्या निमित्त दप्तर वाटप केले दिनांक ३० रोजी सहपरिवार आणि आपल्या नातीच्या हस्ते दप्तरे वाटप केली.
सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बऱ्याचदा आपण असे वाढदिवस खुप मोठ्या पद्धतीने व खर्चिक पद्धतीने साजरा करतो. परंतु मनिषा पाटील यांनी या लहान लहान बालकांची गरज ओळखून मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांना दप्तर वाटप करण्याचे ठरविले आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करून त्या अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याबद्दल संदेश सगळ्यांना देत आहे. यासाठी त्यांना घरातून आपल्या पतीची मुलांची व सुनांची देखील साथ लाभली आहे.
याप्रसंगी त्या म्हणाल्या की, मी सर्वांनाच आवाहन करू इच्छिते की, वाढदिवसासाठी वायफळ पैसा खर्च न करता तो पैसा ज्या गरीब मुलांना खरोखर शैक्षणिक साहित्याची गरज आहे. त्यांच्यासाठी करावा. यात दुग्धशर्करा योग म्हणजे ज्या प्रमाणे चंद्राच्या कलेप्रमाणे नात वाढू लागली तसे त्यांनी दरमहा एक वृक्ष लावून जोपासले व आज ती 1 वर्षाची होतांना त्यांनी पाच वृक्षांचे देशी वृक्षांचे वृक्षरोपण सहपरिवार अंगणवाडी येथे केले. याप्रसंगी लहान मुलांचा आवडीचा खाऊ वाटप करून आपल्या नातीचा वाढदिवस आनंद वाटून साजरा केला.
यावेळी आनंद पाटील, साईनाथ पाटील, राधिका पाटील, सरपंच सरला आहिरे, उपसरपंच बाळू चौरे, अंगणवाडी सेविका उज्वला चौरे, अंगणवाडी सुपर वायझर जया जाधव, छाया जाधव, मंगला माळी, सुशीला महाजन व इतर पालक वर्ग व गावकरी उपस्थित होते.