मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी सकारात्मक जीवनपद्धती अवलंबण्याची आवश्यकता: मानसोपचार तज्ज्ञ रम्या कनन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

आपले मानसिक आरोग्य उत्तमरित्या जोपासण्यासाठी आपण स्वतःच अनेक उपाय-योजनांची आखणी करू शकतो त्यामुळे विशेषतः महाविद्यालयीन युवक-युवतींनी एखाद्या गोष्टीपासून खचून न जाता त्याला सामोरे जात त्यामधून योग्य तो मार्ग काढण्यासाठी सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करावा व स्वताच स्वताला मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत सॉफ्ट स्कील ट्रेनर व प्रसिध्द साइकोलॉजिस्ट रम्या कनन राजकुमार यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानात युवकांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
१० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने शहरातील. जी. एच. रायसोनी महाविद्यालयात एकदिवसीय नॉलेज मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते “बेटर मेंटल हेल्थ अँन्ड वेल-बिइंग” याविषयी बोलत होते. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या होत्या तर अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विगभाप्रमुख प्रा. डॉ.कौस्तव मुखर्जी हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी उपक्रमाची प्रस्तावना मांडताना नमूद केले कि, सामाजिक व भावनिक बांधिलकी निर्माण होण्यासाठी युवावस्था हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. नियमित आहार, व्यायाम, झोपण्याच्या वेळा व त्याचे महत्त्व अशा महत्त्वाच्या सवयी या वयातच पेरले जाणे मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी गरजेचे असते. तसेच आंतरिक, आंतरवैयक्तिक समस्यांचे आकलन करणे व ते सोडवणे हे शिकण्याचे कौशल्य निर्माण झाले पाहिजे. भावनिक संतुलन साधता आले पाहिजे तसेच सॉफ्ट स्कील ट्रेनर व प्रसिध्द साइकोलॉजिस्ट रम्या कनन राजकुमार यांचे सखोल मार्गदर्शन विध्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडेल असे मत डॉ. अग्रवाल यांनी व्यक्त केले. यानंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात साइकोलॉजिस्ट रम्या कनन राजकुमार यांनी पुढे नमूद केले कि, ब-याच गोष्टींवर युवकांचे मन:स्वास्थ्य अवलंबून असते. वेगवेगळ्या कारणांमुळे होणारा तणाव त्यांच्या मन:स्वास्थ्यांवर परिणाम करतो. पीअर प्रेशर, स्वायत्ततेची गरज, टेक्नॉलॉजीची भरपूर उपलब्धता व वापर हा तणाव वाढविण्यास कारणीभूत ठरतात. मीडियामुळे युवकांची समज व वास्तविकता यात तफावत येते. तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनामधील बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होत असलेली युवकांची नकारात्मक विचारसरणी, अनपेक्षित भावनिक गुंतागुंत, मित्र-मैत्रिणी, पालक व परिजनांकडून असणारे अपेक्षांचे ओझे व त्यामुळे होणारे अपेक्षाभंग, उद्भवणारे नैराश्य या व अशा अनेक समस्यांनी सामोरे जात असताना युवकांच्या मनाची होणारी द्विधावस्था टाळण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी उत्तम मानसिक आरोग्य जोपासणे महत्वाचे असून त्यासाठी त्यांनी आपल्या शारीरिक, भावनिक, सामाजिक, अध्यात्मिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान देखील साइकोलॉजिस्ट रम्या कनन राजकुमार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. ज्योती जाखेटे यांनी स्वागत केले तर सूत्रसंचालन प्रा. श्रेया कोगटा यांनी केले तसेच आभार प्रा. कविता पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.