कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला दोन सुवर्ण, एक कास्यपदक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मलेशिया येथील लांगकवी येथे ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान संपन्न झालेल्या आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडके हिने भारताचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये तिने दोन सुवर्ण आणि एक कास्यपदक अशा तीन पदकांची कमाई केली. मूळची मुंबईची राहणारी नीलम घोडके हिने दुहेरीत रश्मी कुमारी सोबत खेळताना महिलांच्या अंतिम सामन्यात भारताच्याच काजल कुमारी आणि देबजानी तामोली यांचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. महिला सांघिक अजिंक्य पद गटात अंतिम सामन्यात भारतीय संघाने अमेरिका संघाचा ३-० ने पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. त्यात नीलम घोडके हिने एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या पूजा राठी हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला.

त्यानंतर महिला एकेरीत भारतीय खेळाडूंनी आपले पूर्ण वर्चस्व राखले आणि क्रमांक एक ते चार अशी चारही पदके आपल्या नावे केली. त्यात पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या रश्मी कुमारी हिने अंतिम सामन्यात पेट्रोलियमच्याच काजल कुमारी हिचा पराभव करून विजेचे पद प्राप्त केले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत नीलम घोडके हिने डिफेन्स अकाउंटच्या देबजानी तामोली हिचा प्रभाव करून कास्यपदक प्राप्त केले. तदनंतर स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या एकेरी सामन्यांमध्ये जैन इरिगेशनच्या अभिजीत त्रीपणकर याने आठ पैकी सात सामने जिंकून पाचवा क्रमांक प्राप्त केला. या गटात आपले सर्व एकेरीचे सामने जिंकत पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या मोहम्मद गुफ्रान याने विजेतेपद प्राप्त केले. पुरुष एकेरीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघातील चारही खेळाडूंनी क्रमांक एक ते चारचे पारितोषिक प्राप्त करून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यात अंतिम सामन्यात संदीप दिवे (महाराष्ट्र) याने उत्तर प्रदेशच्या अब्दुल रहमान याचा अटीतटीच्या सामन्यात २-१ ने पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. तसेच तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या के. श्रीनिवास याने रिझर्व बँकेच्या प्रशांत मोरे याचा पराभव करून कास्यपदक प्राप्त केले.

जैन इरिगेशनच्या नीलम घोडके आणि अभिजीत त्रीपणकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस् अॅकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, समन्वयक सय्यद मोहसीन, सुयश बुरकुल, मोहम्मद फजल व सर्व सहकाऱ्यांनी कौतूक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.