नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
चांद्रयान-३ च्या यशानंतर देशभरातून इस्रो आणि त्यांच्या शास्त्रज्ञांचा जयजयकार होत आहे. या प्रकल्पाशी संबंधित शास्त्रज्ञांचा ठिकठिकाणी गौरव करण्यात येत आहे. नुकतेच इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ इंडिगोच्या विमानाने प्रवास करत होते. यावेळी, जेव्हा लोकांना कळले की ते फ्लाइटमध्ये आहेत, तेव्हा लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केलं.
इंडिगो फ्लाइट अटेंडंटने इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांचे स्वागत केले. अटेंडंटने सांगितले की या फ्लाइटमध्ये इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची उपस्थिती जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. अटेंडंटने एस सोमनाथ यांना म्हटले की, सर तुम्ही या फ्लाइटमध्ये आहात याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला अभिमान वाटेल असा क्षण दिल्याबद्दल धन्यवाद. यानंतर विमानात बसलेल्या प्रवाशांनीही टाळ्यांच्या गजरात एस सोमनाथ यांचे स्वागत केले.
व्हायरल व्हिडिओ
एस सोमनाथ यांना दिलेल्या सन्मानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंडिगो फ्लाइटचा अटेंडंट प्रवाशांना इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्या फ्लाइटमध्ये उपस्थित असल्याची माहिती देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एस सोमनाथ यांना मिळालेला हा सन्मान लोकांना खूप आवडला आहे.
चांद्रयान-3 आता काय करत आहे?
इस्रोने 23 ऑगस्ट रोजी भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिणेकडील भागात यशस्वीरित्या उतरवले. त्याच्या मदतीने 14 दिवस चंद्रावर संशोधन केले जाईल. चांद्रयान-3 चा प्रज्ञान रोव्हर चंद्रावर संशोधन करत आहे. प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या खनिजे इत्यादींचा शोध घेण्यात गुंतलेला आहे. नुकताच प्रग्यानने विक्रम लँडरचा एक फोटोही शेअर केला होता.