पालक-पाल्य नातं सुवर्णमय करण्यासाठी मार्गदर्शन करणारी साहित्यकृती ‘परिस स्पर्श’

0

लोकशाही विशेष लेख

पालक पाल्य नातं सुवर्णमय करण्यासाठी मार्गदर्शन करणारी साहित्यकृती सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. प्रविण दवणे यांनी ‘परिसस्पर्श’ या साहित्यकृतीला वाचकांसाठी आणलय. हे पुस्तक नवचैतन्य या प्रकाशनाने सन डिसेंबर २०१५ मध्ये प्रकाशित केले आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ फार आकर्षक आहे..उत्तुंग झेप घेण्याचा आत्मविश्वास आपल्या मुलाच्या मनात निर्माण व्हावा, यासाठी त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारा बाप, असं हे उद्बोधक चित्र पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना स्पष्ट मांडतं… सदर चित्र पुंडलिक वझे यांनी रेखाटलं आहे..

ठाणे येथे 3५ वर्ष मराठीचे अध्यापन करणारे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. प्रविण दवणे हे वास्तवता मांडणारे, लेखक आहेत. संवेदनशिलता व मार्गदर्शकाची भूमिका हा त्यांचा लेखनाचा गुण आहे. त्यांनी आत्ता पर्यंत कविता, गीतरचना, ललित गद्य, कथा, कादंबरी, नाटक अशा विविध वाड़्मय प्रकारात लेखन केले आहे. त्यांनी आतापर्यंत ८ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भुषविलं आहे.‘परिस स्पर्श’या पुस्तकात प्रविण दवणे यांनी एकूण १ ते ३२ वेगवेगळे विषय घेऊन लिहीलेल लेख संवेदनशील पालक – शिक्षकांसाठी पुस्तक रुपात मांडलेत. आपल्या अध्यापनाचा विषय कुठलाही असो विद्यार्थांशी मैत्री करा. त्यांना बालपण अनुभवू दया असा सल्ला ते देतात.

एका प्रकरणात लेखक म्हणतात, शाळांबद्दल अनास्था आणि घराबद्दल वाटणारं भय ही उद्ध्वस्त भविष्याची नांदी ठरु नये.गैरहजर मुलांची ब्लॅक लिस्ट, भिंतीवर लिहील्याबद्दल रस्टिकेट नाही, गृहपाठ नाही – वर्गाबाहेर, मोबाईल वाजला – झडती, जप्ती हे उपाय नाहीत. या अशा चुका मार्गदर्शनाअभावी भरकटलेल्या मनांकडून अजाणात होतात. अशा असंख्य गोष्टी सुसंवादाने सुखान्त होतात.आक्रमक वाटणारीच खुप मुलं पुढं आपले जिव्हाळ्याचे दोस्त होतात. कारण ऊर्जेचं दिशा शून्य गाठोडं आता योग्य दिशेनं वाहू लागलेलं असतं. पालक व शिक्षकांसाठी आवश्यक हे पुस्तक सर्वांनी जरुर वाचावे व आपल्या गृह ग्रंथालयात आवर्जून संग्रही ठेवावे..

परिस स्पर्श या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक प्रविण दवणे यांनी म्हटलयं, ‘सकारात्मक उपक्रमशिलता हाच विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या नात्याचा प्राणवायू आहे. जगावेगळी अपूर्व क्षमता अंगी असलेल्या नव्या पिढीतील याच क्षमतेचा विकास हेच पालक व शिक्षकाचे कार्य’.
यशाचे साचे आणि टक्क्यांचे मुकुट मिरवणाऱ्या मार्केटिंग युगातील फिरता विक्रेता म्हणजे आपला विद्यार्थी न होता त्याला संपूर्ण माणूसपणाचा निर्मळ आनंदयात्री करावयाचे आहे. त्यासाठीच मैत्रीच्या विश्वासाची ऊब देणारा हा परिसस्पर्श….पालक पाल्य नातं सुवर्णमय करण्यासाठी मार्गदर्शन करणारी खूप सुंदर अशी ही साहित्यकृती आहे.

एकनाथ ल.गोफणे.
चाळीसगाव
मो.8275725423

Leave A Reply

Your email address will not be published.