बारावीच्या प्रश्नपत्रिका जळाल्या तरी परीक्षा नियोजित तारखेलाच होणार

0

लोकशाही  न्यूज नेटवर्क 

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या प्रश्नपत्रिका बुधवारी आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. मात्र, प्रश्नपत्रिका जळाल्या तरी बारावीची परीक्षा नियोजित तारखेला येत्या ४ मार्चपासूनच सुरू होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत निश्चिंत राहून केवळ अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रश्नपत्रिका पुन्हा छापून घेण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा येत्या ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या नियोजनाच्या दृष्टीने राज्य मंडळाने परराज्यातून प्रश्नपत्रिकांची छपाई करून घेतली.

या प्रश्नपत्रिका एका ट्रकमधून नाशिकमार्गे पुण्याच्या दिशेने येत असताना या ट्रकला आग लागली. त्यात बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. त्यामुळे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव अशोक भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.

दरम्यान, प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागतील का, असा प्रश्न निर्माण झाला. बारावीच्या परीक्षा हा संवेदनशील विषय असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. परंतु, विद्यार्थ्यांनी परीक्षेची चिंता करू नये, असे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील, पुढील दोन ते तीन दिवसांत घडलेल्या घटनेबाबत पुढे काय उपाययोजना करणार याची माहिती राज्य मंडळाकडून दिली जाईल. बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने आता प्रश्नपत्रिका छापून त्याचे वितरण करण्याबाबतचे नियोजन केले जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.