मनवेल ता.यावल :- महाराष्ट्रातील सर्व पक्षीय युवा ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच तथा राजकीय सामाजिक कार्यकर्ते युवकांनी एकत्र येऊन एका नवीन संकल्पनेवर आधारीत संघटन उभे केले त्याचेच नाव ग्रामसत्ता एकजूट एकमुठ होय. या संघटनेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा जळगाव येथे संपन्न झाली.
यात राज्य अध्यक्ष पदी तेजस धनंजय पाटील (जळगाव) यांच्या निवडीसोबत राज्य उपाध्यक्ष पदी धनंजय गुंदेकर (बीड) तसेच राज्य कार्यकारणी मध्ये अक्षय राऊत (अकोला), डॉ.पंकज भिवटे (बुलढाणा), सूर्यभान जाधव (सातारा), प्रज्ञा काटे (बारामती), हेमंत ब्राह्मणकर (नागपूर) इ. व काही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष घोषित करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष सौ देवयानी गोविंदवार यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर सर आणि आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे सर उपस्थित होते. यानंतर दिवसभर विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यात सुप्रसिद्ध लेखक, समुपदेशक तथा राजकीय सल्लागार मनोज गोविंदवार सरांनी नेतृत्व गुण व युवा राजकारणी, उपखेड गावाचे माजी सरपंच महेश मगर यांनी यश अपयश आणि आपण, कृषी विभागाचे माजी जिल्हा अधीक्षक अनिल भोकरे सरांनी कृषी योजना व शेती, अजिंक्य तोतला सर यांनी स्टार्ट अप या विषयावर चर्चा सत्र संपन्न झाली.
संघटनेच्या या पहिल्या व्यापक बैठक तथा कार्यशाळेला संपूर्ण महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रतून युवा आलेली होती. महाराष्ट्रातील सर्व पक्षातील युवा एकाच संघटनेमध्ये सामाजिक ध्येय डोळ्यासमोर ठेवून एकत्र आलेली आहेत. या संघटनेत सध्या 2000 सर्व पक्षीय युवा कार्यरत आहेत. युवा शक्तीचा गावातील नागरिकांना, महिला, युवा शेतकरी वर्गाला कसा फायदा करून देता येईल यासोबत ग्रामपंचायत सदस्यांच्या समस्या कशा सोडवता येतील यावर संघटनेचा भर असेल असे मत नवनियुक्त राज्य अध्यक्ष तेजस धनंजय पाटील यांनी मनोगतात सांगितले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन सचिन पाटील सर यांनी केले. या नवीन सामाजिक राजकीय प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.