एकतर्फी प्रेम अन तरुणीवर कैचीने सपासप वार

गुन्हा दाखल करत माथेफिरूला अटक

0

 

वर्धा

 

एकतर्फी प्रेमातून तरुणीला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात घडली. एकतर्फी प्रेमातून भिडी येथे एका माथेफिरूने २३ वर्षीय तरुणीवर कैचीने सपासप वार केले. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत माथेफिरूला अटक केली आहे. संदीप मसराम, असें अटक करण्यात आलेल्या माथेफिरू तरुणाचं नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा जखमी तरुणीच्या गावातलाच रहिवासी आहे. गुरुवारी २३ वर्षीय तरुणी ही आपल्या घरी एकटी होती. दरम्यान ती आपल्या अंगणात भांडे घासत असतांना अचानक आरोपी संदीप तिथे आला आणि त्याने तरुणीच्या गळ्यावर कैचीने वार केले. दरम्यान आरडाओरड झाली असता आरोपी संदीपने घटनास्थळावरून पळ काढला.

 

घटनेत तरुणी ही रक्तबंबाळ स्थितीत परिसरातील पुरषोत्तम रेगे यांना दिसताच त्यांनी कुंपणाचे दार ओलांडून घरात प्रवेश केला. प्रसंगवधान राखल्याने तरुणीचा जीव वाचला. घटनेनंतर माथेफिरू संदीप मसराम हा तरुणीच्या घरात लपून बसला होता. गावकऱ्यांनी त्याला ताब्यात घेत चांगलाच चोप दिला आणि देवळी पोलिसांच्या स्वाधीन केले.

जखमी तरुणीला लागलीच भिडी येथील रुग्णालयात पुरषोत्तम रेंगे व त्यांची मुलगी पूजा हिने रुग्णालयात दुचाकीवर बसवून उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिला सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. तरुणीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.