..तर पक्षातून हकालपट्टी करू ! गिरीश महाजनांनी केली पदाधिकाऱ्यांची कान उघाडणी

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

 

लोकसभा निकालानंतर राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. याबाबत आता महामंथन सुरु आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या मतदार संघात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे. या पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. आता बुथनिहाय कामगिरी तपासल्यानंतर पक्षातंर्गत अनेकांची खरडपट्टी काढण्यात आली आहे.

जळगावमध्ये भाजपच्या कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची चांगलीच कान उघाडणी केली आहे. जळगाव लोकसभेतील उमेदवारांना पाहिजे तसं मताधिक्य न मिळाल्याने मंत्री गिरीश महाजन यांची पदाधिकारी कार्यकर्त्यांवर नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

जळगाव लोकसभेच्या स्मिता वाघ यांना एकूण 3 ते साडे तीन लाख एवढे मताधिक्य मिळेल अशी मंत्री गिरीश महाजन यांची अपेक्षा होती.जळगाव शहरातूनही त्या त्या बुथवर पाहिजे त्या प्रमाणात मताधिक्य मिळाले नाही. काही भागात हक्काचा मतदार होता, तिथे पण मतांचा टक्का न वाढल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी नगरसेवकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे.

जळगाव शहरातील जी एम. फाउंडेशन या संपर्क कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांनी तब्बल एक तास बंद दारा आड बैठक घेतली. यामध्ये त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना चांगलेच कान टोचले असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने चूक पुन्हा केल्यास पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी या बंद द्वार बैठकीत पदाधिकाऱ्यांना इशारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.