किती ग तो तुझ्या मनातील पोरकेपणा…!

0

 लोकशाही विशेष लेख

 

प्रत्येक शरीराच्या आत भरलेलं मन असतं आणि त्यासोबत खचलेलं एक ह्रदय असतं. त्याला खूप काही सांगायचं असतं, खूप काही ऐकून घ्यायचं असतं.. पण हेच सगळं समजून घेणारं एक रिलेशन असावं लागतं. आणि नेमकं हेच रिलेशन आपण कधी आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी किंवा मित्र मैत्रिणींमध्ये शोधू पहात असतो. बऱ्याच वेळा आपल्याला नक्की काय म्हणायचंय आणि आपल्याला नक्की काय होतयं, हे आपल्याला कीतीतरी वेळा सांगताच येत नाही. आपला हा असहायपणा कोणाला कधी समजतच नाही. तेव्हा मनाची होणारी हतबलता खूप जीवघेणी असते. स्त्रीयांच्या बाबतीत तर हे सहज घडून जातं. मुले मोठी होऊन आपल्या विश्वात रमायला लागली की स्त्री एकाकी पडते. मुख्यत्वे ती जर गृहिणी असेल तर चाळीशी नंतर किंवा तिच्या रजोनिवृत्तीच्या काळात तिच्यात ही सहायतेची भावना खूप प्रबळ होत जाते. त्याक्षणी तिला असं वाटतं की आपण न बोलता समोरच्याने ते समजून घ्यावं. आपल्या मनातलं, खदखदणारं, न सांगता येणारं दु:ख त्याने समजून घ्यावं असंच वाटत असतं. पण प्रत्यक्षात असं होत नाही. तिच्या मनातील हा अदृश्य पोरकेपणा मोठा मोठा होत जातो आणि ती अधिकच मनांतून खोल पोखरली जाते. पण यावर मार्ग तर शोधवाच लागतो. स्वताहून शोधता आला तर उत्तमच..

सर्वात आधी तिने आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करणं स्वीकारलं पाहिजे. जगात सुखी असा कोणी नाही, प्रत्येकाच्या पाठी व्यथा आहेत, हे मान्य केलं पाहिजे. कारण प्रत्येक जण फक्त सुखी आसल्याचा शुद्ध देखावा करीत असतो. व्यक्ती सापेक्ष त्याचे दुःख भिन्न असू शकते. पण ते असतं हे नक्कीच. यावर फक्त एकच ब्रीद अंगिकाराव आणि ते म्हणजे ‘जीवनात अडचणी येणे हे ‘ पार्ट ऑफ लाईफ’ आहे. आणि त्यातून हसत बाहेर पडणे ही ‘आर्ट ऑफ लाईफ’ आहे. कारण एकदा का मनात दुःख, उदासीनता मनात घर करून बसलं की, ते घर करून बसत. त्याला काढणं सोप नसतं. ते दुःख माणसाला संपवतं. म्हणून ती वेळीच उखडून फेकण्याची क्षमता आपल्यात आणली पाहिजे. आपल्या असण्याला, आपल्या अस्तित्वाला आपण आधी प्राधान्य स्वतः दिलं पाहिजे, कारण ते आपलं असलं तरी ते आपल्या पेक्षा इतरांच्याच हातात जास्त असतं. ते आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार उगाच आपण इतरांना देऊन ठेवलेला असतो. याच साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण सुंदर दिसतो’ ही गोष्ट जरी आपल्या मनाला माहित असली, खरी असली तरी त्याची कबुली समोरच्या व्यक्तीने दिल्याशिवाय त्या सुंदरतेला अस्तित्व असूनही अस्तित्व नसतं. सोशल मिडिया वरील प्रोफाइलचा चेहरा सुद्धा खूप सुंदर आहे, हे तेव्हाच आपल्याला मान्य असतं जेव्हा तिकडून त्याला लाईक किंवा कमेंट येते.

एकूण काय तर विश्वनिर्मात्याने माणसाला जन्म दिला. तोही पांगळा, जगण्यासाठी इतर कुणाची तरी कुबडी लागतेच. माणसा-माणसाला ह्या कुबडीनेच बांधून ठेवलंय. तुला माझी अन मला तुझी कुबडी हवीच, या कुबड्याच मुळी आपल्याला काढून फेकता आल्या पाहिजेत. ‘माझ्या अस्तित्वावर माझा अधिकार आहे’ हा विश्वास स्वतःत आणला पाहिजे. आयुष्य जगत असतांना आपण आपल्याच नकळतच एक अदृश्य, बंदिस्त चौकट आखून ठेवत जात असतो. ती कीतीही आखीव, रेखीव, शिस्तबद्ध असली तरी ती चौकट आपले स्वप्न, आपला आनंद बंदिस्त करीत असते. आणि मग आपण तिष्ठत राहतो, कोणाच्या तरी सहवासासाठी, कोणाच्या तरी सांमजस्यांसाठी, कोणी तरी येईल आणि आपल्या मनातील सल ओळखेल. या खोट्या आशावादी पंखाखाली स्वतःला लपवून घेतो. हे लपणे आपण थांबवले पाहिजे. स्वतःशी बोलायला, स्वतःला ओळखायला शिकायला पाहिजे.

एकदा का आपण हे शिकलो तर रोजच्या जीवनात, निसर्गात वावरतांना प्रत्येक गोष्टींचे येता जाता अगदी सहजपणे निरीक्षण आपल्याला करता येईल आणि प्रत्येक उमलणारी फुले, पाने, पक्षी, जनावरे अगदी कोवळी, लहान असतांना कीती शुध्द, निरागस आणि गोड दिसतात, आणि ती कशी स्वताहून प्रफुल्लित राहतात याचे ‘रहस्य’ आपसूक आपल्याला कळायला लागेल. म्हणजेच निसर्ग आपले काम कीती चोख, आणि काटेकोरपणे बजावतो हे आपणास कळेल आणि आपणही आपलं काम कसं चोख करावं हे आपणास कळू लागेल. याच निसर्गातील मोगा-यालाही कधी कधी स्वप्नं रंगांचे पडते, गुलाबाला ही कायम दुःख त्याच्या बोचरे काट्यांचे असते, प्राजक्ताला नेहमीच भीती तिच्या ओघळण्याची वाटते आणि या साऱ्यात समाधानी असते. ती दुरून हे सार पाहत असलेली बाभळी, ती मात्र मनातल्या मनात हसत असते. तीच ते हसणं आपण शिकू या. जगासाठी ‘क्लोज’ असलेली पाटी ही दुसऱ्या बाजूने खूप सकारात्मक असते. कारण तिच्या दुसऱ्या बाजूवर ‘वेलकम.. ओपन’ असं लिहलेले असतं. आपण त्या वेलकमकडे पाहू या, पण त्यासाठी जग उलट करून न पाहता जगाला आतून पाहणं शिकूया. म्हणजे आपसूक आपल्या मनात साठलेला पोरकेपणा गळून पडेल आणि आपलं जीवन आपल्यासाठी आनंददायी ठरेल…

 

वैशाली पाटील, जळगाव
९४२०३५०१७१

Leave A Reply

Your email address will not be published.