फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२३-२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यास एकूण २५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे लक्षांक प्राप्त झाले आहे. या योजनेत फळबाग लागवड व फुलपिके लागवडीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेतंर्गत कमीत कमी ०.०५ हेक्टर ते जास्तीत जास्त २.०० हेक्टर क्षेत्रावर इच्छुक लाभार्थ्यांना लागवडीचा लाभ देण्यात येणार आहे. अनु. जाती, अनु. जमाती, भटक्या जमाती, निरधी सूचित जमाती, दारिद्य रेषेखालील कुटुंब, स्त्री कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, जमीन सुधारणाचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेतंर्गत लाभार्थी, अनु जमातीचे व इतर पारंपारीक वनवासी अधिनियम २००६ मधील पात्र लाभार्थी आदि या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मजूर कार्ड (जॉबकार्ड) आदि कागदपत्रे तसेच ग्रामपंचायतीने मान्य केलेल्या लाभार्थी यादीत नाव असणे व प्रपत्र अ व प्रपत्र ब (फळबागेचे कार्य ग्रामपंचायत किंवा कृषि विभाग यापैकी कोणाकडून राबविण्यात रस आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा) सादर करणे बंधनकारक आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण फळबाग लागवड योजनेतंर्गत केळी, आंबा, चिकू, पेरू, बोर, सिताफळ, कागदी लिंबू, डाळींब, आवळा, सिताफळ, मोसंबी इत्यादी फळपिके व गुलाब, मोगरा, निशीगंध, सोनचाफा, इत्यादी फुलपिके लागवडीचा लाभ देण्यात येतो.

या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र लाभार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र- अ) व संमती पत्र (प्रपत्र ब) ऑफलाईन पद्धतीने आपल्या गावातील ग्रामपंचायत किंवा संबंधित कृषि सहाय्यक/तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडे सादर करावे. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.