जिल्ह्यातील दोन्ही जागांच्या निकालाबाबत तर्क-वीतर्क..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

लोकसभा निवडणूक निकालाची ४ जून तारीख जसजशी जवळ येतेय, तसतशी देशात, महाराष्ट्रात आणि आपल्या जिल्ह्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक राजकीय विश्लेषकांनी आपापल्या पद्धतीचे विश्लेषण करून ‘निकाल कसे लागतील’ याचे विश्लेषण केलेले आहे. महाराष्ट्रात महायुतीने एकूण ४८ जागांपैकी २७ जागा लढविल्या. त्यापैकी किती जागांवर भाजपचे उमेदवार ‘विजयी होतील’ आणि कितीही जागांवर भाजपच्या उमेदवारांना ‘पराभवाचा धक्का बसू शकतो’ याबद्दलची उत्सुकता लागलेली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील एकूण सहा जागांपैकी भाजपच्या पाच जागांवर आतापर्यंत भाजपने आपला गड कायम राखला आहे. २०१४ आणि २०१९ प्रमाणे २०२४ ला उत्तर महाराष्ट्रात भाजपचेच उमेदवार विजयी होतील का? या प्रश्नाचे उत्तर अनेक विश्लेषकांनी वेगवेगळे ‘तर्क लावून’ दिले आहेत. त्यापैकी धुळ्याचे सुभाष भामरे यांचे सुरुवातीपासूनच पारडे जड असून ते बाजी मारतील, असे जवळपास सर्वच विश्लेषकांचे म्हणणे आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या भाजपच्या जागेबाबत मात्र तेथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘अटीतटीचा सामना’ आहे. भारती पवारांना कमालीची मेहनत या संघात घ्यावी लागली. त्यामुळे भारती पवार यांचा ‘निसटता विजय अथवा पराभव’ होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. नंदुरबार या आदिवासी राखीव मतदार संघात २०१४ आणि २०१९ या दोन्ही वेळा भाजपच्या डॉ. हिना गावित या विजयी झाल्या. २०२४ ला तिसऱ्यांदा भाजपने डॉ. हिना गावितांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास टाकला असला, तरी काँग्रेसचे अॅड. गोवाल पाडवी यांनी त्यांच्यासमोर फार मोठे आव्हान निर्माण केले आहे. नंदुरबार मतदार संघात नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचार सभा झाली. त्या सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला. तथापि त्यानंतर काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांच्या झालेल्या जाहीर सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने जाहीर सभेचे सर्व रेकॉर्ड तोडले. त्यामुळे भाजपच्या डॉ. हिना गावित आणि अॅड. गोवाल पाडवी यांच्यात झालेल्या ‘काटे की टक्कर’ मध्ये कोण ‘बाजी मारेल’ याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्हा हा गेल्या २५ वर्षापासून भाजपचा ‘बालेकिल्ला’ राहिला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये जळगाव तसेच रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपला भाजपच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. वास्तविक २०१९ मध्ये उन्मेष पाटील यांनी देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवून विजयी होण्याचा बहुमान मिळवला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक महिना आधी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्याने प्रचारासाठी महिन्याच्या कालावधी मिळाला असला, तरी एक महिन्याच्या कालावधीत विरोधकांकडून नाट्यमय घडामोडी घडल्या. खासदार उन्मेष पाटलांनी उद्धव ठाकरे शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधून त्यांचे नजीकचे मित्र पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांना खासदारकीचे तिकीट देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मैदानात उतरवले. त्यामुळे भाजपसाठी एकतर्फी वाटणाऱ्या जळगाव लोकसभा मतदारसंघात कमालीची चुरस निर्माण झाली. यंदा मोदी लाट नसल्याने ‘स्थानिक मुद्द्यांवर प्रचारात रंगत’ आली त्यामुळे जळगाव लोकसभेची भाजपची जागा चुरशीची बनली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करण पवार यांनी जोरदार टक्कर दिल्याने ‘कुणाचाही विजय झाला तरी निसटता होईल’ अशी चर्चा संपूर्ण मतदार संघात सुरू आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात २०१४ आणि २०१९ ला रक्षा खडसे यांना भाजप उमेदवारी दिली आणि दोन्ही वेळा प्रचंड मताधिक्याने रक्षा खडसे विजयी झाल्या. रक्षा खडसेंवर विश्वास टाकून भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. एक महिना आधी खासदार रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर झाल्याने महिनाभराच्या कालावधीत रक्षा खडसेंनी मतदारसंघ पिंजून काढला. ऐनवेळी विरोधकांतर्फे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्योगपती श्रीराम पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नवखे उमेदवार श्रीराम पाटील हे ‘प्रचारात मागे पडले’ असे वाटत असतानाच, स्थानिक मुद्द्यावर रावेर लोकसभा संघातल्या प्रचाराला ’धार’ आली. त्यातच श्रीराम पाटील हे मराठा समाजाचे आहेत. सोबत मराठा समाज मतदार संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे यंदा मराठा समाज असला तरी पण खासदार रक्षा खडसे यांचे मताधिक्य फार मोठ्या प्रमाणात घटणार आहे, एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.