जळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या व्यथा

0

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव जिल्ह्यातील केळी आणि कापूस या नगदी पिकांबरोबर उसाचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जात जाते. केळी उत्पादनात जळगाव जिल्हा अग्रेसर असला तरी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होत आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने केळी उत्पादक शेतकरी समाधानी नाही. केळी पिकाच्या विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली जात आहेत. दुसरे नगदी पीक असलेल्या कापसाला शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हटले जाते.

तथापि गेल्या दोन वर्षापासून कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कापसाचा उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. गेल्या वर्षी कापसाला भाव मिळत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील एकूण कापूस उत्पादनाच्या 35 ते 40 टक्के कापूस अद्याप शेतकऱ्यांच्या घरात विक्री अभावी पडून आहे. यंदाच्या वर्षी तर कापूस उत्पादनाची दैनावस्था निर्माण झाली आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली तशी कापसाची पेरणी झाली. त्यामुळे उत्पादनात घट झाली. त्यातच दुष्काळात तेरावा महिना, म्हणजे अवकाळी पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. एकरी दहा क्विंटल येणारे कापसाचे उत्पादन अक्षरशः चार क्विंटलवर आले. उत्पादन खर्च मात्र दहा क्विंटलसाठी जेवढा झाला तेवढाच झाला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. कापसाला भाव मात्र ६५०० ते ७००० रुपये इतकाच मिळतोय.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून शेतकरी टाहो फोडत आहे. परंतु अद्याप पंचनामे सुद्धा झालेले नाहीत. कापूस उत्पादक शेतकरी दृष्ट चक्रात सापडला आहे. जळगाव जिल्ह्यात उसाचे क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. नगदी पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. तथापि गेल्या चार-पाच वर्षांपासून जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे. रावेर यावल तालुक्यातील केळी पिकांबरोबरच उसाचे पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. परंतु ४० वर्षांपूर्वी सहकार क्षेत्रात उभारला गेलेला मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षापासून बंद पडलेला आहे. जळगाव जिल्हा बँकेचे कर्ज थकल्यामुळे दोन वर्षांपूर्वी जिल्हा बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला. दरम्यान हा कारखाना खाजगी व्यापाऱ्याला विकून बँकेने आपले कर्ज वसूल केले.

गेल्यावर्षी खाजगी व्यापाऱ्याकडून कारखाना चालक चालवण्याचा प्रयत्न झाला; परंतु राजकारण आडवे आले. कारखाना सुद्धा सुरू करण्यास शासनाने स्थगिती दिली. त्यामुळे रावेर यावल तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला ऊस दुसऱ्या कारखान्याला पडत्या भावाने विकावा लागला. यंदाच्या हंगामात कारखाना सुरू होईल असे वाटत होते, परंतु कारखाना सुरू झाला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर ऊस विक्रीची समस्या आ वासून उभी आहे. तसेच मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना काम नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. राजकीय स्पर्धेमुळे मधुकर सहकारी साखर कारखाना बंद पडून आहे.

जळगाव जिल्ह्यात सहकार क्षेत्रात म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मालकी असलेल्या एकूण सहा कारखान्यांपैकी एरंडोल तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखाना अनेक वर्षापासून बंद पडलेला आहे. जिल्हा बँकेच्या ताब्यात असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याची खाजगी व्यापाऱ्याला विक्री करण्याचे प्रयत्न झाले, पण ते प्रयत्न फसले. आज हा कारखाना भंगार अवस्थेत पडून आहे. परिसरातील ऊस उत्पादक दुसऱ्या पिकाकडे वळले. चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा सहकारी साखर कारखाना सुद्धा बंद पडला होता. जिल्हा बँकेने त्याची खाजगी व्यापाराला विक्री केली. दोन वर्ष हा कारखाना कसाबसा चालला आणि यंदाच्या हंगामात तोही बंद पडला. चाळीसगाव तालुक्यात उसाचे क्षेत्र घटल्यामुळे कारखान्याला ऊस मिळत नाही, हे कारण पुढे करून कारखाना बंद ठेवल्याचे कारखान्याचे संचालक चित्रसेन पाटील यांनी सांगितले. यामुळे चाळीसगाव तालुक्यात ऊस उत्पादक शेतकरी जिल्ह्याबाहेर उसाची विक्री करत आहेत.

रावेर तालुक्यातील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर कारखाना तर सुरुवातीपासूनच अडचणीत आलेला होता. तो सुद्धा कारखाना खाजगी व्यापाऱ्याला विकला गेला. परंतु खाजगी व्यापाऱ्याने कारखाना विकत घेतल्यापासून कोर्टाच्या फेऱ्यात अडकल्याने कारखाना बंद अवस्थेत पडून आहे. जिल्ह्यातील चोपडा सहकारी साखर कारखाना बारामती ऍग्रो कंपनीला भाडेतत्त्वावर करारावर दिला गेला आणि तो कसाबसा रडत रडत चालू आहे. चोपडा परिसरात उसाचे क्षेत्र घटल्याने कारखान्याला ऊस पुरेसा मिळत नसल्याने दुसरीकडून ऊसाची आयात केली जात आहे. तीच अवस्था मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई सहकारी साखर कारखान्याची आहे. खाजगी क्षेत्रात असलेला हा कारखाना चालू असला तरी मुक्ताईनगर तालुक्यातील उसाची घटते क्षेत्र असल्याने हा कारखाना सुद्धा दुसरीकडून ऊस आयात करतो. एकंदरीत जळगाव जिल्ह्यातील नगदी पीक ऊसाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. उसाचे उत्पादन वाढीसाठी कोणत्याही स्तरावर प्रयत्न केले जात नाहीत. त्यातच उसाला जो भाव मिळाला पाहिजे तो मिळत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहे. आज ऊस उत्पादक शेतकऱ्याची मालकी असलेले सहकारी क्षेत्रातील साखर कारखाने बंद पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. नाईलाजाने ऊसा ऐवजी दुसऱ्या पिकाकडे शेतकरी वळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अवस्था जाणून घेणार कोण हा खरा प्रश्न आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.