धुळे लोकसभा : भामरेंची हॅटट्रिक होईल का?

काँग्रेस, भाजप आणि एमआयएममध्ये होणार लढत

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढत भाजपने गेल्या तीन निवडणुकीत मतदारांना स्वतःच्या बाजूने वळवण्यात यश मिळालेला मतदारसंघ म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ. भाजपने मतदारसंघात सलग दोन वेळा खासदार बनलेले डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे खासदारकीची हॅटट्रिक करण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. भाजप कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. पण दुसरीकडे महाविकास आघाडीतली परिस्थिती अद्याप याच्या पूर्ण उलट असल्याचे दिसत आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला आहे. पण काँग्रेसने अद्याप उमेदवारीच जाहीर केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडे तसा ताकदीचा उमेदवार नसल्याची चर्चा व्यक्त केली जात आहे.

मुस्लीम मतदारांची संख्या आणि एमआयएमची शक्ती यामुळे एमआयएम येथे काय भूमिका घेणार त्याकडेही लक्ष लागलेले आहे. त्याचाही निवडणुकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. लोकसभा मतदारसंघाचा विचार करता नाशिक आणि धुळे दोन जिल्ह्याचा भाग या मतदारसंघांच्या अंतर्गत येतो. तसेच बहुजन, आदिवासी, मुस्लीम अशा संमिश्र मतदारांचा प्रभाव असल्यानं या मतदारसंघाच्या निकालांकडे लक्ष लागलेले असते.

शिवसेनेलाही होत्या तिकिटाच्या अपेक्षा

धुळे मतदारसंघात विद्यमान भाजपचा खासदार असला तरी याठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनेही तयारी सुरू असल्याच्या चर्चा होत्या. दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे हे या मतदारसंघातून खासदारकीची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत होते. अविष्कार भुसे यांनी मतदारसंघात प्रचंड जनसंपर्क वाढवल्याचे पाहायला मिळाले होते. अविष्कार भुसे यांचे काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये भावी खासदार असे पोस्टर लावण्यात आले होते.

धुळे लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीलाच भाजप किंवा तेव्हाच्या भारतीय जनसंघाला लोकसभेत प्रतिनिधित्व मिळवून देणारा मतदारसंघ होता. 1957 मध्ये जनसंघाचे उत्तमराव पाटील धुळ्याचे पहिले खासदार बनले होते. पण त्यानंतर काँग्रेसनं या मतदारसंघावर वर्चस्व मिळवलं ते तीन दशकांपर्यंत कायम राहिलं. या दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये चुडामन पाटील तीन वेळा, विजयकुमार पाटील एकदा तर रेश्मा भोये या तीन वेळा खासदार बनल्या. नंतरच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस उमेदवारांना मतदारांनी दरवेळी बदलून संधी दिली. पण 2009 नंतर मात्र मतदारसंघामधली ही परिस्थिती बदलली.

तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपच्याच ताब्यात आहे. 2009 मध्ये भाजपकडून प्रताप सोनवणे यांना इथून उमेदवारी दिली. त्यांना अमरीश पटेलांना पराभूत करत विजय मिळवला. त्यानंतर 2014 मध्ये सुभाष भामरेंना इथून संधी मिळाली. त्यांना सलग दोन वेळा विजय मिळवत इथले भाजपचे वर्चस्व कायम ठेवले.

Leave A Reply

Your email address will not be published.