देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाची झडप

खासगी बस-ट्रकच्या अपघातात १३ भाविक ठार : यल्लम्माच्या दर्शनाहून येतांना दुर्दैवी घटना

0

 

कर्नाटक 

 

कर्नाटकमध्ये हावेरी जिल्ह्यात आज शुक्रवारी पहाटे भीषण रस्ते अपघातात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मिनी बसच्या भीषण अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे कर्नाटकमध्ये अपघाताची ही घटना घडली. हावेरी जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. हावेरी जिल्ह्यातील बागडी तालुक्यातील गुंडेनहल्ली क्रॉसजवळ ट्रक आणि मिनी बसची धडक झाली. या अपघातामध्ये बसमधील १३ भाविकांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण देवदर्शनावरून आपल्या गावाकडे जात होते त्याचवेळी हा अपघात झाला.

 

थांबलेल्या ट्रकला मिनी बसची धडक 

       पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गवर ट्रक थांबला होता. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव मिनी बसने ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये बसमधील भाविकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह बाहेर काढणे देखील कठीण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

 

यल्लम्माच्या दर्शनाहून येतांना काळाची झडप 

       अपघातामध्ये मृत्यू झालेले आणि जखमी झालेले सर्वजण शिवमोग्गा येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण बेळगाव जिल्ह्यातील सावदट्टी येथून यल्लम्माच्या दर्शनासाठी गेले होते. देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना त्याच्यावर काळाने झडप घातली. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, बस चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाला. पुढील तपास सुरू केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.