उदयनराजेंना दिलासा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच !

0

नवी दिल्ली : माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर रिकाम्या झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. विधानसभेसोबत २१ ऑक्टोबरलाच सातारा लोकसभा पोटनिवडणुक होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने आज केली. यामुळे उदयनराजे भोसले यांना विधानसभेचा आधार मिळाला आहे.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपात जाहीर प्रवेश केला होता. भाजपात जाण्यापूर्वी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे साताऱ्याची जागा रिकामी झाली होती. उदयनराजे भाजपात गेल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक होणार असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात होता. पण, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना साताऱ्याचा कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे साताऱ्याची विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्याच्या विधानसभेसोबत २१ ऑक्टोबरला सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २४ ऑक्टोबरला विधानसभा मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे.

विधानसभेसोबत लोकसभेची पोट निवडणूक होणार असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध उदयनराजे असा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी साताऱ्यात सभा घेऊन उदयनराजेंना लक्ष्य केले होते. त्यानंतर येथे जोरदार लढत होणार हे निश्चित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.