भडगावात मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र सरकार कामगार विभाग यांच्या वतीने कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ आज गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भडगाव येथे करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून बांधकाम कामगारांना शासनाच्या वतीने मध्यान्न भोजन योजना जाहीर झाली आहे. मात्र भडगाव येथे ही योजना मिळत नसल्याकारणाने याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून ही योजना सुरू करण्यासाठी मेहनत घेतली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव शहरात या योजनेचा आजपासून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील, अविनाश अहिरे, जुम्मन शाह, सूर्यकांत गोंड, संजू गौंड, बापूभाऊ शार्दुल, समन्वयक राकेश पाटील, नितीन भोई, आबाभाऊ भोई, प्रमोद पाटील, कैलास भोई, सुभाष ठाकरे, नरेंद्र मोरे, पोलीस पाटील, भूषण पाटील, युवराज कुंभार आदी मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कामगारांना वरण,भात,भाजी,पोळी लोणचे असे गरमा गरम भोजन वाटप करण्यात आले.

कामगार विभागाचे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शहरातील विविध भागांमध्ये दोन वेळेचे जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना शासनाच्या कामगार विभाग कडून सुरू झाली असून भडगाव येथे राकेश पाटील हे समन्वयक म्हणून काम पाहात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्याकडे नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी यावेळी बोलतांना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.