आकोडे काढल्याच्या रागातून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

महिला कर्मचाऱ्याला चक्क सर्व्हिस वायरने मारले

0

 

भुसावळ | लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथे वीज कंपनीच्या महिला कर्मचार्‍यासह तीन जणांना वीज तारांवर टाकलेले आकोडे काढल्याच्या रागातून मारहाण करण्यात आल्याचे घटना मंगळवारी १८ जून रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाणीच्या घटनेविरोधात वीज कंपनीतील कर्मचार्‍यांनी व्यक्त करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी १८ जून रोजी सकाळी ११.३० वाजता भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी गावात गेले होते. यावेळी त्यांना वीज तारांवर आकोडे टाकण्यात आल्याचे दिसून आले. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी हे आकोडे काढले.

 

महिला कर्मचाऱ्याला सर्व्हिस वायरने मारहाण

दरम्यान आकोडे काढल्याचा राग आल्याने संशयीत गणेश उर्फ गोल्या माधव सोनवणे व देवा (पूर्ण नाव माहित नाही) यांनी वीज कंपनीचे वरीष्ठ तंत्रज्ञ समाधान भास्कर बुगले व सचिन काकडे यांना मारहाण केली. दरम्यान गर्दीतील दोन अनोळखी महिलांनी वीज तारांवरील काढलेल्या सर्विस वायरनेच महिला कर्मचारी आशा सुनील भटकर यांना मारहाण केल्याने गदारोळ उडाला.

 

मारहाणीच्या प्रकारानंतर कर्मचार्‍यांनी ही घटना सहा. अभियंता विकास कोळंबे, उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांना कळविण्यात आली. त्यानुसार वीज कंपनीचे वरीष्ठ तंत्रज्ञ समाधान भास्कर बुगले (वय-३४, खडका, ता.भुसावळ) यांनी दुपारी ४ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी गोल्या माधव सोनवणे, देवा व अन्य दोन अनोळखी महिलांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शामकुमार मोरे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.