आजपासून तरुणाईचे खाकी वर्दीचे स्वप्न होणार पूर्ण

आजपासून एकूण १७ हजार ४७१ पदांसाठी भरती प्रक्रिया

0

 

जळगाव जिल्ह्यात एकूण  १३७ जागांसाठी आले ६ हजार ५५७ अर्ज

 

मुंबई/जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यातील तरुणाईचे वर्दीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया अडकून पडली होती. मात्र आजपासून अखेर भरतीचा बिगुल वाजला. राज्यातील विविध जिल्ह्यांत पोलीस भरतीसाठी सकाळपासूनच तरुणाईने गर्दी केली आहे. विविध मैदानांवर तरुणांनी त्यांचे कसब दाखवले.

 

तरुण तरुणी चाचणीसाठी मैदानावर पोहचले असून विविध जिल्ह्यांतील एकूण १७ हजार ४७१ पदांसाठी ते प्रयत्न करणार आहेत. काही ठिकाणी पावसाने व्यत्यय आणला असला तरी परीक्षार्थींची उमेद आणि उत्साह कायम दिसला. राज्यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई सिलेक्शनसाठी जीवाची बाजी लावत आहे.

 

जळगाव : १३७ जागांसाठी ६ हजार ५५७ अर्ज

जळगाव जिल्ह्यात आजपासून १३७ जागांसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. १३७ जागांसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांचे एकूण ६ हजार ५५७ अर्ज आले आहेत. आज ५०० उमेदवारांना शारीरिक तसेच मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे. जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहाटे साडेचार वाजता उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊन पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक चीपचा वापर

जळगाव जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी पहिल्यांदाच धावण्याच्या चाचणीसाठी इलेक्ट्रॉनिक चीपचा वापर केला जात आहे.. आजपासून सात दिवस पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार असून यात पुरुष तसेच महिला उमेदवारांच्या शारीरिक मैदानी कागदपत्र तपासणीसह तसेच इतर प्रक्रिया पार पडणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे निगराणीत पार पडणार आहे.

 

 

१७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज

राज्यात आज १९ जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली. एकूण १७ हजार ४७१ जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आले आहेत. बँड्समन पदाच्या ४१ जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या १६८६ जागा, पोलीस शिपाई पदाच्या ९५९५ जागा तर शीघ्र कृती दलासाठी ४ हजार ३४९ जागांसाठी राज्यातील परीक्षार्थ्यांनी कंबर कसली आहे.

 

रत्नागिरी : ८ हजार ७१३ अर्ज

रत्नागिरीमध्ये पावसाच्या व्यत्ययानंतर पोलीस भरतीसाठीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. पोलीस भरती सुरू असतानाच पावसाची दमदार हजेरी लागली. रिमझिम रिमझिम पावसामध्ये मैदानी खेळाच्या चाचण्या सुरू झाल्या. १४९ पोलिस शिपाई आणि २१ चालक पदाच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. १७० जागांसाठी तब्बल ८ हजार ७१३ अर्ज आले आहेत. रत्नागिरी शहरात दोन ठिकाणी भरती प्रक्रिया होईल. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आणि एमआयडीसीमध्ये ही भरती प्रक्रिया होत आहे.

 

चंद्रपुर : २ हजार ७२२ अर्ज

चंद्रपुर पोलीस दलाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या पदांसाठी पोलीस शिपाई भरतीची आजपासून सुरुवात झाली. भरतीमध्ये एकुण १३७ पोलीस शिपाईची आणि ०९ बॅण्डस्मनची रिक्त पदे भरण्यात येणार आहे. शिपाई पदासाठी एकूण २२५८३ उमेदवारी अर्ज तर बॅंडसमन जागेसाठी २७२२ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची योग्य तारीख दिली जाणार आहे.

 

पुणे : १ लाख ८१ हजार ७६९ अर्ज

पुणे शहर, ग्रामीण, लोहमार्ग पोलीस दल, तसेच कारागृह विभागातील १२१९ पदांसाठी आज पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. १ लाख ८१ हजार ७६९ उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज दाखल केले आहेत.पुणे पोलीसांचे शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, ग्रामीण पोलिसांचे चव्हाणनगर येथील मुख्यालय, खडकीतील दारूगोळा कारखान्याच्या मैदानावर मैदानी चाचणी पार पडणार आहे.

 

पुणे पोलीस दलातील २०२ पदांसाठी २० हजार ३८२ अर्ज दाखल दाखल झाले. पुणे जिल्हा ग्रामीण दलामध्ये ४९६ पदांसाठी ४२ हजार ४०३ अर्ज दाखल झाले. कारागृहातील शिपाई पदाच्या ५१३ जागांसाठी एक लाख १० हजार ४८८ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. पुणे लोहमार्ग विभागाच्या ६८ पदांसाठी तीन हजार १८२ अर्ज दाखल झाले. उमेदवारांची शारीरिक मोजमाप पडताळणी आणि मैदानी चाचणीचा टप्पा आजपासून सुरू होत आहे.

 

नाशिक : १२ हजार अर्ज

नाशिक शहर हद्दीत १८८ तर ग्रामीण पोलीस हद्दीत ३२ जागांसाठी मैदानी चाचणी होत आहे. जवळपास १२ हजार मैदानी चाचणीसाठी उमेदवारांचे अर्ज आले आहेत. पावसाचा व्यत्यय आल्यास राखीव दिवशी भरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

अमरावती : २८१ जागा 

अमरावती जिल्ह्यात २८१ जागेसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ग्रामीण मध्ये २०७ तर शहर मध्ये ७४ जागेसाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. पारदर्शक पद्धतीने पोलीस भरती होणार असल्याचे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलीस अधिक्षकांनी केले आहे.

 

 

छत्रपती संभाजीनगर : ९७ हजर ८४७ अर्ज

जिल्ह्यात ७५४ जागांसाठी पोलिसांची भरती सुरू आहे. यासाठी तब्बल ९७ हजार ८४७ तरुणांनी अर्ज केले आहेत. पोलीस भरतीसाठी रात्रीपासूनच परीक्षार्थी यायला सुरुवात झाली होती. यावेळी मिळेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला या मुलांनी रात्र काढल आणि सकाळीच पोलीस भरतीला ग्राउंडवर हजर झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.