समाजमनात वकीली क्षेत्राची परंपरा रुजविण्याचा वसा घेतलेले अत्रे कुटूंबीय – मान्यवरांचे उद्गार… 

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

समाजमनात आपल्या प्रामाणिक, प्रांजळ उद्देशाने वकीली हे क्षेत्र अत्रे कुटूंबीयांनी रुजविले यासह कायदाप्रती जागरुकता केली. ते कायम आपल्या कामाप्रती एकनिष्ठ राहीले. १०० वर्ष त्यांनी आपल्यातील परंपरा ही कायम ठेवत कुटूंबातील सर्व सदस्यांनी हा वसा रुजविला आहे. संपुर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कार्यप्रणालीची ख्याती असून अत्रे परीवाराचे न्यायदानातील याेगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.

रविवारी जैन हिल्स परीसरात ‘अत्रे वकील द लॉ फर्म’ च्या शतकपुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परीचय ऍड. निलीमा संत यांनी करुन दिला.  यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती ए.पी.भंगाळे, विशेष सरकारी वकील उज्वल निकम, अधिवक्ता परीषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मीरा खडक्कर, जैन उद्याेग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल चे माजी अध्यक्ष ऍड. जयंत जायभावे, अत्रे वकील फर्म चे सुशील अत्रे होते. मान्यवरांचा सन्मान प्रतिमा अत्रे, पद्मजा अत्रे, ऍड. निशांत अत्रे यांच्याहस्ते करण्यात आला.

प्रसंगी दिप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. तर अत्रे वकील यांच्या शतकपुर्ती निमित्त स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी माजी न्यायमुर्ती ए.पी.भंगाळे म्हणाले की, माझ्या जडणघडणीत अत्रे परीवाराचा खूप मोठा वाटा आहे. अत्रे बाबा म्हणजेच ज्येष्ठ विधिज्ञ अच्युतराव अत्रे हे अत्यंत हुशार व्यक्तीमत्व होते. एखाद्या खून खटल्यात त्यांचे प्रश्न हे मार्मिक असायचे. त्यांना कुठे थांबायचे अचूक माहिती होते. त्यांच्या मागे बसून मी त्यांना पाहायचो की ते कसे उलट तपासणी करतात. त्यांच्याकडूनच मी शिकलो आहे. वकीली क्षेत्रात त्यांचे नाव श्रेष्ठ होते असे म्हणत त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे मीरा खडक्कर, जयंत जायभावे यांच्यासह अत्रे परीवारातील ज्येष्ठ विधिज्ञ अशाेक माथुरवैश्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुशील अत्रे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करीत आठवणींनाही उजाळा दिला. सूत्रसंचालन सोनिका मुजूमदार,  आभार ऍड. पंकज अत्रे यांनी मानले. यावेळी ‘आत्रेय’ आश्रम परीवारातील सगळ्यांचे सहकार्य मिळाले.

वकीलीचे विद्यापीठ अत्रे परीवार…

विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांनी यावेळी सांगितले की, अच्युतराव अत्रे बाबा यांच्याकडून मी खूप काही शिकलाे. खटल्यात समोरचा आक्रमक झाल्यास आपण कसे आक्रमक व्हावे कसे बोलावे हे त्यांनी मला शिकविले. त्यांनी अनेक कानमंत्र मला दिली. वकीली व्यवसायाला वेगळा आयाम निर्माण करणारे त्यांचे व्यक्तीमत्व होते. जनमानसात हे क्षेत्र पाेहाेचविण्याचे कार्य त्यांनी केले. खटल्याचा निकाल हा विरुद्ध लागोकी बाजूने त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एकसारखे असायचे. यासाठी तुम्ही स्थितप्रज्ञ असायला लागतात. अत्रे बाबा हे त्यातील होते जे खुप कमी व्यक्तींमध्ये पाहायला मिळते. द्रोणाचार्य हे गुरु होते परंतू एकलव्यचे गुण माहिती झाल्यावर त्यांनी देखील त्याच्याकडे गुरुदक्षिणा म्हणून अंगठा मागितला होता पण आमचे अत्रे बाबा हे निस्वार्थ होते. अनेक विद्यार्थी त्यांनी निस्वार्थ पणे घडविले. वकीलीचे विद्यापीठ ते होते. तर्कशास्त्राने कायद्याचा कसा वापर झाला पाहिजे यावर त्यांनी कायम भर दिला. त्यांच्या पुस्तकांचा तरुणांनी अभ्यास करणे गरजेचे असल्याचेही मत यावेळी निकम यांनी व्यक्त केले.

प्रांजळपणाने कायद्यात तेजस्वी ठसा उमटविलेला परीवार…

सरस्वतीचा वरदहस्त असलेला हा परीवार असून प्रांजळपणाने कायद्यात आपला तेजस्वी ठसा उमटविलेला परीवार असल्याचे मत जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले. सुवर्णांकीत अक्षराने या परीवाराचा उल्लेख केला जाईल. आपल्या कार्यात प्रामाणिकपणा, सचोटी त्यांनी कायम जपली आहे. त्यांच्या परीवारात सुरु झालेली परंपरा आजही शिस्तीच्या बाबतीत कायम आहे. प्रत्येकाचे पहिले प्रेम वेगळे असले अत्रे परीवाराचे पहिले प्रेम हे कायदा, वकीली क्षेत्र आहे. भवरलालजी जैन आणि अत्रे बाबांची मैत्री ही खूप मोठी होते. दोघांनाही पुस्तकांची आवड. व्यावसायिक नाते हे पारीवारीक यांच्या मैत्रीतूनच बहरले आहे. आपल्या मैत्रीतील आत्मीयता ही कायम दोघांनी जपली आहे. चांगल्या व्यक्तींचे कायम नोंद होते. आज समाजात चांगले काम करणारे परीवार तीही परंपरागत जपणारे कमी पाहायला मिळतात. त्यापैकी अत्रे परीवार असून समाजात याचे उत्तम उदाहरण असल्याचेही प्रतिपादन करीत अनेक आठवणींना अशोक जैन यांनी उजाळा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.