लोकशाही न्यूज नेटवर्क
जालन्यातील दगडफेक प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज झाल्यानंतर हिंसा आणि जाळपोळ प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जालना स्थायिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील अंतरवाली सराटी हिंसा आणि जाळपोळ प्रकरणी अंबड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंबड पोलिसांनी ४ जणांचा बीड जिल्ह्यातील गेवराईमधून ४ जणांना ताब्यात घेतलं आहे.
प्रमुख आरोपी सराईत गुन्हेगार
पोलिसांनी ऋषिकेश बेद्रे (४३), निलेश राठोड (४३), शनीदेव शिरसठ(२२), कैलास सुरवसे (४१), यांना ताब्यात घेतलं आहे. अंतरवाली सराटी येथील जाळपोळ प्रकरणात ताब्यात असलेल्या चारही जणांचा हात असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेद्रे यांच्याकडे गावठी पिस्तूलसह २ जिवंत काडतुसे सापडली आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेले चारही जण सराईत गुन्हेगार असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर यापूर्वी ही गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. पोलिसांना त्यांच्याजवळ एक पिस्तूल (गावठी कट्टा) आणि दोन जिवंत काडतुसे सापडले आहेत.