युवा पुत्र गमावलेल्या कोळी दांपत्याला मंगळग्रह सेवा संस्थेकडून रोजगार

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील एकलहरे येथील लौकी नाल्यामध्ये भरत कोळी यांचा हाताशी आलेला युवा पुत्र बुडून त्याचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी पिता भरत व माता भारती कोळी यांनी सातत्याने पोलिस व प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याबाबत कोणावरही कारवाई करणे पुरावे आणि तत्सम तांत्रिक बाबींचा अभावी पोलिस आणि प्रशासनाला शक्य झाले नाही. अखेरीस या बाबीकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी कोळी दाम्पत्याने २६ जानेवारीला कचेरी बाहेर आमरण उपोषणास प्रारंभ केला होता.

प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी त्यांची समजूत काढली. हाताशी आलेला व रोजगारासाठी सक्षम असलेला मुलगा गमावल्याचे मोठे दुःख या दांपत्याला होते. त्यावर आम्ही तुमच्या रोजगारासाठी एखाद्या समाजसेवी संस्थेला किंवा दानशूर व्यक्तीला आवाहन करतो. जेणेकरून तुम्हाला काहीतरी रोजगार उपलब्ध होईल, असे प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी त्या दांपत्याला सांगितले. त्यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले उपस्थित होते. प्रांताधिकारी आहिरे यांनी याबाबत महाले यांना विचारणा केली. महाले यांनी तत्काळ होकार दिला.

कोळी दांपत्याला न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारे ॲड. अभिजीत बिऱ्हाडे त्यांनीही दाम्पत्याचे मन वळविले. महाले यांनी दाम्पत्य व ॲड. बिऱ्हाडे यांना सांगितले की, तुम्हास रोजगारासाठी जे काही हवे आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही ते तुम्हाला घेऊन देऊ. तसेच तुमच्या दुसऱ्या मुलाने आर्थिक बिकटतेमुळे बारावीनंतर शिक्षण सोडून दिले आहे. त्याची शिकायची तयारी असल्यास त्याला सर्व प्रकारची शैक्षणिक मदतही करू. दुसऱ्या दिवशी कोळी दांपत्य व ॲड. बिर्‍हाडे यांनी रोजगारासाठी चक्की घेण्याचा निर्णय घेतला. तसे महाले यांना कळविले. त्यांनी तत्काळ होकार दिला. त्यांना चक्की घेऊन दिली. चक्की विकत घेतल्याची पावती प्रांताधिकारी अहिरे यांच्या शुभहस्ते कोळी दांपत्यास दिली.

याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन .पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिररराव, जयश्री साबे तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष उमेश वाल्हे, शितल देशमुख, ॲड. अभिजित बिऱ्हाडे आदी उपस्थित होते. कोळी दांपत्य, ॲड. बिऱ्हाडे व प्रांताधिकारी अहिरे यांनी मंगळग्रह सेवा संस्थेला धन्यवाद दिले.

मंगळग्रह सेवा संस्थेला आहे सामाजिक जाणिवेचे उचित भान…!

मंगळग्रह सेवा संस्था केवळ एक धार्मिक संस्था नसून जनतेला व शासनाला जेव्हा जेव्हा त्यांच्या सहकार्याची आवश्यकता भासली आहे तेव्हा तेव्हा त्यांनी मुक्तहस्ताने तन-मन-धनाने सहकार्य केले आहे. या संस्थेला सामाजिक जाणिवेचे उचित भान ठेवणारी संस्था म्हणून जी ओळख मिळाली आहे, त्याची प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा आली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.