राज्यासाठी दिलासादायक बातमी ; मे महिन्यापासून लाट ओसरणार?; पण…

0

मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंज देणाऱ्या राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाची लाट ओसरणार आहे, अशी माहिती कोविड टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी दिली आहे. मात्र, लाट ओसरली तरी कोरोना नियमांचं पालन करावंच लागणार असल्याचंही टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी सांगितलं.

कोविड टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी हे भाकीत वर्तवलं आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 30 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे. मात्र, ही लाट ओसरल्यानंतर आपल्याला वेगाने लसीकरण करावे लागेल, असा सल्लाही या डॉक्टरांनी दिला आहे.

लसीकरणाच्या वेळा ठरवाव्या

तज्ज्ञांच्या मते, राज्यातील प्रत्येक लसीकरण केंद्र साधारण 12 तास सुरु राहिले पाहिजे. पहिल्या 6 तासात वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण करण्यात यावे. त्यानंतर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करायला पहिजे. तरच कोरोना लसीकरणाचा अपेक्षित वेग गाठता येईल.

त्रिसूत्री हवीच

कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला तरी सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीची अंमलबजावणी काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. त्या शिवाय पर्याय नाही, असंही या डॉक्टरांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात कोरोना बळींची संख्या दिवसे न् दिवस घटताना दिसत आहे. मात्र, कोरोना बळींचा आकडा काही कमी होताना दिसत नाही. काल राज्यात 48,700 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 524 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 71,736 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. गेल्या सहा दिवसांत राज्यभरात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.