बाहेर कोरोना, घरात मच्छर’; पेण शहरवासी हैराण !

0

पेण :  पेण शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे आजार पसरण्याची भीतीही व्यक्त केली आहे. त्यामुळे नगरपरिषदेने याची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

एकीकडे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक आधीच मेटाकुटीला आले असताना, पेण शहरवासियांना नवीन समस्या भेडसावू लागली आहे. पेण शहरातील काही भागात डासांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. कोरोनाची भीती मनात असताना आता नागरिकांना डासांचीसुद्धा भीती वाटू लागली आहे.

संचारबंदीमुळे सर्व मंडळी आपापल्या घरात बसून आहेत; तर काही नागरिक घराच्या आवारात बसत आहेत पण या डासांचा उपद्व्याप जसा बाहेर तसाच घरातदेखील स्वस्थ बसून देत नाहीत. “बाहेर कोरोना, घरात डास” यामुळे नागरिक वैतागले आहेत. डासांमुळे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. लवकरात लवकर डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाची दखल घेऊन, नगरपरिषदेने त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.