जळगावच्या कुसुंबा गावात दाम्पत्याची हत्या

0

जळगाव :  जळगाव जवळच्या कुसुंबा गावात दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चोरीच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तींनी दोरीने गळा आवळून दोघांचा खून केल्याचा संशय आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत दाम्पत्याच्या मुलीने फोन केल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी घरी जावून पाहिल्यानंतर ही खळबळजनक घटना समोर आली. मुरलीधर राजाराम पाटील (वय ५४) आणि आशाबाई मुरलीधर पाटील (वय ४७) अशी मृतांची नावे आहेत.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील ओमसाई नगरात पाटील दाम्पत्य राहत होते. मुरलीधर पाटील हे जळगावातील दिलीप कांबळे नामक एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला होते. पाटील दाम्पत्याला स्वाती व शीतल अशा दोन मुली आहेत. यातील स्वाती हिचे सासर यावल तालुक्यातील सावखेडा तर शीतलचे चोपडा तालुक्यातील वेले येथे आहे. बुधवारी सायंकाळी शीतलने आई आशाबाई यांना नेहमीप्रमाणे फोन केला होता. तेव्हा दोघींमध्ये कौटुंबीक चर्चा झाली होती. त्यानंतर पुन्हा रात्री साडेआठ वाजता शीतलने आईला फोन केला. पण आईचा फोन लागला नाही, म्हणून तिने वडिलांना फोन केला. वडिलांनी देखील फोन घेतला नाही. कदाचित रात्र झाल्याने दोघे झोपले असतील म्हणून तिने नंतर फोन केला नाही.

शीतलने गुरुवारी दुपारी पुन्हा आईला फोन केला. पण फोन लागला नाही. वडिलांनी देखील फोन घेतला नाही. त्यामुळे शीतलने तिची आजी रखुमाबाईला फोन केला. तेव्हा रखुमाबाई यांनी मुरलीधर पाटील यांचे साडू संतोष पाटील यांना फोन करून शीतलसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. नंतर रखुमाबाई व संतोष पाटील हे दोघे जण पाटील कुटुंबीयांच्या घरी गेले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता. घरात गेल्यावर दोघांना धक्का बसला. दुमजली घराच्या खालच्या मजल्यावरील शेवटच्या खोलीत आशाबाई मृतावस्थेत पडल्या होत्या. गळा आवळून त्यांचा खून झाल्याचे दिसून आले. नंतर ते वरच्या मजल्यावर गेले. तेथे बाहेर गच्चीच्या एका कोपऱ्यात मुरलीधर पाटील हे देखील मृतावस्थेत पडलेले होते. त्यांचाही दोरीने गळा आवळलेला होता. या घटनेची माहिती त्यांनी तत्काळ मुलगी शीतलला दिली. ग्रामस्थांना घटनेची माहिती झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना घटना कळवण्यात आली. पोलीस लागलीच फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नातेवाईकांचे तसेच परिसरातील लोकांचे जाबजबाब नोंदवले.

चोरीच्या उद्देशातून हत्या?

घटनेनंतर कुसुंबा येथे आलेली पाटील दाम्पत्याची मुलगी शीतल हिने दिलेल्या माहितीनुसार, तिची आई आशाबाई यांच्या अंगावर दागिने नव्हते. तसेच घरातील दोन कपाटे उघडी होती. पण घरात पाटील दाम्पत्य व्यतिरिक्त दुसरे कुणीही राहत नसल्याने नेमका कितीचा ऐवज आणि काय-काय वस्तू चोरीला गेल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान चोरीच्या उद्देशानेच ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या वर्षी पाटील दाम्पत्य हे कुसुंब्यात दुसरीकडे राहत होते. त्यावेळी त्यांच्या घरी एका मुलाने चोरी केली होती. या घटनेनंतर त्या मुलाने पाटील दाम्पत्याला त्रासही दिला होता, अशी माहिती देखील समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.