साहेब! हे फक्त तुम्हाला शक्य होतं

0

जळगाव:-(प्रतिनिधी) : शुक्रवारी रात्री संस्थेच्या कार्यालयातून शिपाई सभेचा अजेंडा घेऊन आला. मीटिंग रविवारी नियोजित होती. प्राचार्य पदावरून मला निलंबित करण्याबाबतचा एक विषय अजेंड्यावर होता. माझं गरिबाचं कोणी वालीं नव्हतं. तशात माननीय कुलगुरू मेश्राम साहेबांची आठवण झाली. कारण माणूस बहाद्दर होता, धाडसी होता, चटके सहन करत मोठ्या पदावर पोहोचलेला होता, नागपूर च्या हमालपुर्‍याची कणखरता रक्तात होती, अन्यायी माणसांच्या यातना सोसलेल्या होत्या, आणि म्हणुन खात्री होती की साहेब न्यायाची बाजू घेतील. शनिवार रविवार विद्यापीठाला सुटी होती. साहेब विद्यापीठात असल्याची खात्री केली आणि भल्या पहाटे विद्यापीठ गाठलं. साहेब आणि मॅडम योगा संपवून गेस्ट हाऊस टेकडीवरून खाली उतरत होते.

साहेबांना आणि मॅडम यांना नमस्कार म्हटलं.

अरे आप्पा इतने सुबह? ( खाजगीत कधी कधी साहेब मला गरिबाला आप्पा म्हणत.) साहेबांना आश्चर्य वाटलं. मी साहेबांच्या हातात अजेंडा ठेवला. माझ्याशी सबंधित विषय वाचून साहेबांनी शिक्षण व्यवस्थे बदल चिंता व खंत व्यक्त केली आणि अतिशय आस्थेने चौकशी करत विचारलं, ” बोलों मै आपके लिए क्या कर सकता हूं?”

मी माझ्या अपेक्षा व्यक्त करत म्हटलं, “मी विद्यापीठ समिती द्वारे नियुक्त असा मान्यताप्राप्त प्राचार्य आहे. महाविद्यालयाच्या नावलौकिकात मी मोठी भर टाकली आहे. माझी कोणतीही चूक नसतांना मला अकारण निलंबित केले जात आहे. यावर विद्यमान परिस्थितीत काहीही उपाय नाही का? आणि असलाच तर तो तुम्ही सांगू शकता. मी आपणाकडे न्यायासाठी आलो आहे.

क्षणाचाही विलंब न लावता साहेब म्हंटले, ” आज मै आपको एक पत्र देता हूं. वह आपको भविष्य मे काम आएगा. आप रजिस्ट्रार, संचालक बी सी यू डी को 11 बजे विद्यापीठ मे पहुचे ऐसा मेरा संदेश भेजो.”

साहेबांना मी आठवण करून देण्यासाठी म्हटलं, “सर, आज तो विद्यापीठ छुट्टी है”

साहेब म्हंटले, “जिस दिन कुलगुरू चेयर मे बैठे होते, उस दिन विद्यापीठका कामकाजी दिन समझो ”

केवढी ही संवेदना? केवढी ही ताकत? केवढी ही ऊंची? केवढी ही समज? दोन ओळीं मधलं वाचायला, गर्भित अर्थ कळायला मोठ्ठा शहाणपणा लागतो. तो शहाणपणा कुलगुरू आदरणीय प्रा सुधीर मेश्राम साहेबांकडे होता.

मला टाळायचं राहिलं असतं तर साहेबांकडे सोपं कारण होतं. ते म्हणु शकले असते “आज तो छुट्टी हैं”. हेच तर असामान्य आहे, हेच तर दुर्मिळ आहे. चाकोरीबद्ध लोकांना हे शक्य नाही.

ठरल्या नुसार विद्यापीठ उघडलं गेलं. माझ्याकडुन अर्ज मागितला गेला. साहेब व इतर मान्यवर विद्यापीठात आले. पत्र तयार झालं. त्याला जावक क्रमांक दिला गेला. मला पत्र देतं साहेब म्हंटले, ” दरों मत. आप अन्याय के खिलाफ लड़ रहे हो. डटे रहो. All the best”.

मला या पत्राने धीर दिला. माझ्या अन्याया विरूद्ध सुरू असलेल्या संघर्षाला एका मोठ्या संस्थेने मान्यता दिली. माझ्या प्रामाणिक भूमिकेला यश आलं. लोक येतात, पदं उपभोगतात. सेवा घडते ती कै. सुधीर मेश्राम साहेबांची. म्हणुन हे किर्ती रूपी उरतातच. साहेब या जगात आम्हा गरीब दलित पीडितांना आपण असायला हवे होतात.

श्रद्धांजली

माजी कुलगुरू डॉ•सुधीरजी मेश्राम ह्यांचे नागपूर येथील अवंती हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान देहावसान झाल्याचे कळले. अत्यंत दुःख झाले. अन्यायग्रस्त किवा ज्यांच कोणी वालीं नाही त्याने मेश्राम साहेबांकडे जावं व न्याय मिळवावा अशी कामाची पद्धति आम्ही जवळून अनुभवली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या विकासात सरांनी फार महत्तवपूर्ण भूमिका बजावली होती. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम सरांना आणून डॉ•सुधीरजी मेश्राम सरांनी विद्यापीठास नावलौकिक मिळवून दिला. भारत सरकारकडून संशोधन आणि विद्यार्थी हिताचे विभाग उभारण्यासाठी मोठा विकास निधी आणून विद्यापीठाचा मूलभूत विकास माननीय मेश्राम साहेबांच्या काळात साधला गेला. कामचुकार, लबाड, नाटकी माणसांना ताबडतोब ओळखण्याची उत्तम क्षमता माजी कुलगुरू डॉ•सुधीरजी मेश्राम साहेबांची होती. उत्तम संशोधक, कुशल प्रशासक, गरीब – दलित – ग्रामीण विद्यार्थ्यांचे कैवारी, धाडसी व्यक्तिमत्व, शिस्तप्रिय प्राध्यापक, चांगले मित्र अचानक निघून गेल्याचं मोठं दुःख सर्वांनाच झालं आहे. सरांच्या जाण्याने व्यक्तिगत हानी झाली आहे. सरांच्या जाण्याचं दुःख सहन करण्याची शक्ति श्रीमती प्रा. मेश्राम मॅडम, मुलगा आणि परिवाराला लाभो आणि आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना!

– प्रा. डॉ. एल. ए. पाटील,

माजी प्राचार्य प्रताप महाविद्यालय अमळनेर तथा
माजी सदस्य, व्यवस्थापन परिषद, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.