अमृत महोत्सव समारंभाच्या पूर्वसंध्येला पार्थिवावर साश्रूनयनांनी मानपत्र अर्पण

0

नशिराबादच्या सार्वजनिक वाचनालयाचे कार्यकारी सदस्य गोपाळ वाणी यांचेवर काळाचा घाला

जळगाव   (प्रतिनिधी) – नशिराबाद येथील नामांकित सार्वजनिक वाचनालयाचे कार्यकारिणीतील एक सदस्य सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ विश्वनाथ वाणी (वय 75) यांचा रविवार दिनांक 7 फेबु्रवारी रोजी वाचनालयाचे वतीने अमृतमहोत्सवी सत्कार आयोजित केला होता. तथापि आदल्या दिवशी शनिवारी 6 फेबु्रवारी रोजी हृदयविकाराने त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे सत्कार समारंभाच्या पूर्वसंध्येला गोपाळ वाणी यांच्या पार्थिवावर साश्रुनयनांनी त्यांना दिले जाणारे मानपत्र वाचनालयातर्फे ठेवून त्यांना मानवंदना देण्यात आली.

कै. गोपाळ वाणी यांचे मृतदेहावर मानपत्र अर्पण करून साश्रुनयनांनी श्रध्दांजली अर्पण करतांना प्रा.युवराज वाणी व इतर

नशिराबाद येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त गोपाळ विश्वनाथ वाणी आणि रत्नाकर रामभाऊ पांढारकर या दोघांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार आयोजित करण्यात आला होता. परंतु दुर्दैवाने गोपाळ वाणी यांचे आज शनिवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. सायंकाळी अंत्यविधी करण्यात आला.

तत्पूर्वी सत्काराच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रा. युवराज वाणी यांचे हस्ते आणि सार्वजनिक वाचनालयातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी कै. गोपाळ वाणी यांना रविवारी भव्य समारंभात देण्यात येणारे मानपत्र आणि सन्मान त्यांच्या पार्थिवावर ठेवून साश्रुनयनांनी मानवंदना दिली. अंत्ययात्रेला सुरू करण्यापूर्वी जळगाव येथील कै. गोपाळ वाणी यांच्या निवासस्थानासमोर अशा या प्रसंगामुळे सर्व नातेवाईक आणि उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

कै.गोपाळ वाणी यांच्या सत्काराच्या आदल्या दिवशी त्यांना मृत्युने गाठले. हा दैवदुर्विलासच म्हणता येईल.वाचनालयाच्या वतीने कै. गोपाळ वाणी यांना श्रध्दांली वाहण्यात आली. तसेच रविवार दिनांक 7 फेबु्रवारी रोजी होणारा रत्नाकर पांढारकर अमृत महोत्सव समारंभ तात्पुरती स्थगित करण्यात आल्याचे प्रा. युवराज वाणी यांनी सांगितले.

कै.गोपाळ वाणी हे सेवानिवृत्त शिक्षक हे मूळ नशिराबादचे रहिवासी होते. सध्या ते जळगाव येथे अयोध्यानगरातील रामचंद्रनगरात राहात होते. त्यांनी शिक्षक म्हणून कन्नड तालुक्यातील चापानेर येथे सेवा दिली. चापानेर करांचेही त्यांनी मने जिंकली होती.

चापानेर येथील जि.प. सदस्यांनी कै.गोपाळ वाणी यांना वाहिलेली श्रध्दांजली येथे जसेच्या तसे देत आहोत.
श्री.वाणी सर.  हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील पण त्यांनी अनेक वर्षे चापानेर येथील शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली,त्यांचे चापानेर गावा विषयी आपुलकी व प्रेम होते दर वर्षी चापानेर गावात होणाऱ्या श्री.हनुमान जयंतीच्या सप्ताहाच्या वेळेस आम्हला फोन करून कार्यक्रमासंधार्भात विचारणा करायचे व न चूकता आपली देणगी पोस्टानी पाठवत असे व गावातील अश्या अनेक सामाजिक,धर्मील कार्यात नेहमी माहिती घेऊन देणगी पाठवत असे आत्ताच आमचे 8 दिवसांपूर्वीच आदरणीय श्री.वाणी सर यांच्याशी बोलणे झाले होते होणाऱ्या सप्ताह बद्दल त्यांनी विचारणा केली मी सप्ताहला येण्याचा प्रयत्न करेल असे त्यांनी आश्वसन दिले होते पण देवाला काही वेगळेच मान्य होते आणि आज आदरणीय श्री.वाणी सर हे आपल्याला सोडून वैकुंठात गेले…भगवंत त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…… असे लोक फार कमी असतात.

लोकशाही परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Leave A Reply

Your email address will not be published.