धक्कादायक : बहिणीला घ्यायला जाण्यापूर्वीच भावाचा तलावात बुडून मृत्यू

0

जळगाव : ड्युटी आटोपून भाऊ आपल्या बहिणीला सासरहून आणण्यासाठी निघणार होता. मात्र, तिला घ्यायला जाण्यापूर्वीच ड्युटीवर असताना तलावात बुडून भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी  शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅलीच्या समोर असलेल्या अनुभूती शाळेच्या आवारातील डिव्हाईन पार्कमध्ये घडली.

शंकर तुकाराम सपकाळे (३२, रा.मोहाडी, ता.जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच भावाने जगाचा निरोप घेतल्याने बहिणीसह कुटुंबाने प्रचंड आक्रोश केला.

याबाबत माहिती अशी की, मोहाडी येथील शंकर सपकाळे हा जैन व्हॅली कंपनीत वॉटर मेन्टेनन्स विभागात कामाला होता. सोमवारी रक्षाबंधन असल्याने मोठा भाऊ किशोर याने त्याला रविवारी सकाळीच बहिणीला घ्यायला जायला सांगितले. मात्र ड्युटीवर जाणे आवश्यकच असल्याने तेथून आल्यावर जाईन, असे सांगून तो सकाळीच ड्युटीला गेला. डिव्हाईन पार्कमध्ये तलावात साफसफाईचे काम करीत असताना सकाळी १०.३० वाजता आतमध्ये असलेल्या वायरमध्ये पाय अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.

शंकर याला पोहता येत होते, मात्र वायरींगमध्ये पाय अडकल्याने त्याला निघणे अवघड झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर इतर सहकाऱ्यांनी त्याला बाहेर काढून तातडीने कंपनीच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र वैद्यकिय अधिकारी डॉ.नितीन जाधव यांनी त्याला मृत घोषित केले.रक्षाबंधनाच्या आधीच शंकरच्या या घटनेने कुटुंबासह गावाला धक्का बसला आहे.

शंकरच्या पश्चात आई- वडील, पत्नी निता, मुलगा देवांश, दोन भाऊ असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.