साठवण तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

0

जळगाव : शेतात फवारणी केल्यानंतर साठवण तलावात हातपाय धुवायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी विटनेर, ता.जळगाव शिवारात घडली. योगेश ज्ञानेश्वर वराडे (२०) व ज्ञानेश्वर दगडू ढमाले (२७)  असे या दोन्ही मृत तरुणांचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर दगडू ढमाले याच्या शेतात गुरुवारी फवारणीचे काम सुरु होते. योगेश हा देखील ज्ञानेश्वरसोबत गेला होता. सायंकाळी काम आटोपल्यानंतर दोघही साठवण तलावात हातपाय धुवायला गेले. योगेश याचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्ञानेश्वर याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाळ व खोल खड्डा असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर हा देखील बुडाला. दरम्यान, मुलगा पाण्यात बुडत असल्याचे लांब असलेल्या दगडू ढमाले यांना दिसले, त्यांनी आरडाओरड करुन घटनास्थळी धाव घेतली. काही तरुणांनी तलावात उडी घेतली, मात्र तोपर्यंत दोघंही मृत झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील साहेबराव धुमाळ यांनी  म्हसावद दूरक्षेत्राच्या पोलिसांना माहिती कळविली. हवालदार शिवदास चौधरील बळीराम सपकाळे, सचिन देशमुख, स्वप्नील पाटील व समाधान पाटील यांनी धाव घेतली. मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.