धक्कादायक ! वाघूर नदीच्या प्रवाहात साकेगावातील सासू-सून गेल्या वाहून !

0

भुसावळ प्रतिनिधी । वाघूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे  साकेगावातील सासू-सुना वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. सिंधूबाई अशोक भोळे (वय, अंदाजे ६५) आणि योगिता राजेंद्र भोळे (वय, सुमारे ३५ वर्ष)  असे या दोन्ही सासू-सुना असून आता त्यांचा शोध घेतला जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंधूबाई अशोक भोळे यांची योगिता राजेंद्र भोळे ही सून होती. या दोन्ही साकेगावातील मशिदीच्या मागे राहत होत्या. त्यांची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने नदी पात्रात वाळू गाळून त्या उदरनिर्वाह चालवत होत्या.यानुसार त्या आज देखील सकाळी गेल्या होत्या.

दरम्यान, धरणातून पाणी सोडल्यामुळे अचानक पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढू लागला. यामुळे त्या घाबरून तुलनेत उंच ठिकाणी असणार्‍या भागावर जाऊन मदतीसाठी धावा करू लागल्या. तथापि, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्या वाहून गेल्या. यावेळी पुलावर असणार्‍या काही जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी यात त्यांना यश आले नाही. अवघ्या काही मिनिटांमध्ये त्या पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेल्या. ही माहिती गावात मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही महिलांचा शोध घेण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.