उत्तरप्रदेश हादरले! गुन्हेगारांबरोबरच्या चकमकीत आठ पोलिस शहीद

0

लखनौ: उत्तरप्रदेशातील कानपूर येथे आज गुन्हेगारांची एक टोळी आणि पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत आठ पोलिस कर्मचारी शहीद झाले तर अन्य सात जण जखमी झाले आहेत. शहीद झालेल्यांमध्ये एका पोलिस उप अधिक्षकाचाही समावेश आहे. दरम्यान अन्यत्र झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन गुंडाना ठार केले आहे. पोलिसांची हत्या करण्याच्या घटनेत या दोन गुंडांचा हात होता असे सांगण्यात येत आहे.

कानपुरच्या पोलिस महानिरीक्षकांनी सांगितले की, पोलिसांनी दोन गुंडांना वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गोळीबारात ठार केले असून त्यांच्याकडून आधीच्या चकमकीत पोलिसांकडून हिसकाऊन घेण्यात आलेले पिस्तुलही जप्त करण्यात आले आहे. एक पोलिस पथक विकास दुबे नावाच्या गुंडाला पकडण्यासाठी दिक्रु गावात गेले असताना तेथे पहिली चकमक झाली.

दुबे हा सुमारे 60 गुन्ह्यातील आरोपी आहेत. गुंड दुबे ज्या ठिकाणी आश्रयाला होता तेथे पोलिस पथक पोहचताच त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. त्यात तीन उपनिरीक्षक, एक पोलिस उपअधिक्षक आणि चार कॉन्स्टेबल असे आठ जण शहीद झाले.

काही वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की दुबेच्या ठिकाणावर पोलिसांचा छापा पडणार आहे याची कल्पना त्याला पोलिस दलातल्याच त्याच्या हस्तकाकडून मिळाली असावी. कारण दुबे ज्या ठिकाणी लपून बसला होता त्याच्या जवळच्या रस्त्यावर त्याने अडथळे उभारून हा रस्ता बंद केला होता. पोलिस पथक तेथे थांबले असतानाच त्यांच्यावर घराच्या छतावरून गोळीबार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची जादा कुमक तेथे पाठवण्यात आली होती. जे सात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे असे
सांगण्यात येते.

दुबे हा खतरनाक गुंड आहे. आत्तापर्यंत त्याने अनेकांच्या हत्या केल्या आहेत. भाजपचा मंत्री दर्जाचा एक नेता संतोष शुक्‍ला यांची त्याने सन 2001 मध्ये पोलिस ठाण्यात घुसून हत्या केली होती. या चकमकीत शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी श्रद्धांजली वाहिली असून त्यांनी शहीद पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभुती प्रकट केली आहे.

दरम्यान कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आणि अन्य विरोधी पक्ष नेत्यांनी उत्तरप्रदेशातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवरून योगी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.