ठोस निर्णयाचा चेंडू आयसीसीने पुन्हा टोलवला

0

दुबई :–आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) बैठक बुधवारी कोणताही ठोस निर्णय न घेता पार पडली. ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्‍वकरंडकाबाबत निर्णय होणे अपेक्षित असताना आणखी एक महिना परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय घेणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले.

करोनाने निर्माण झालेली परिस्थिती पाहूनच पुढील काळातील स्पर्धांबाबत निर्णय घेतला जाईल, असे बुधवारी बैठक पार पडल्यावर आयसीसीने स्पष्ट केले असले तरीही आयसीसी टी-20 विश्‍वकरंडकाबाबत पर्याय शोधत आहे का, बीसीसीआयला आयपीएलसाठी विंडो उपलब्ध करून देण्यासाठी बैठकांचा खेळ करत आहे, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

एकीकडे भारतातील करपद्धतीवरून आयसीसी व बीसीसीआय यांच्यात तेढ निर्माण झाली आहे. त्याचवेळी सध्याचे आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांचा कार्यकालही जुलैमध्ये संपुष्टात येत असून या पदासाठी इच्छुकांचे नामांकनही या बैठकीत करण्यात येणार होते. मात्र, कोणताही ठोस निर्णय न घेता ही बैठक पार पडली.

ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्‍टोबरमध्ये होत असलेली टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा तसेच पुढील वर्षी होणारी महिला क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेबाबत सध्या वेळापत्रक तयार करण्यापूर्वी परिस्थितीची चाचपणी करण्यात येणार असल्याचेही आयसीसीने सांगितले आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व स्पर्धांचे आयोजन करताना खेळाडूंसह सपोर्ट स्टाफच्या आरोग्याला सर्वांत जास्त प्राधान्य दिले जाणार आहे.

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती एका दिवसात बदलणार नाही त्यासाठी आणखी काही वेळ थांबावे लागणार असून पुढील महिन्यात पुन्हा एकदा बैठक घेऊनच निर्णय घेतला जाईल, असेही आयसीसीने स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.