जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर वाढण्याचे कारण काय?

0

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. त्यात जळगाव, अमळनेर, भुसावळ आणि पाचोरा हे कोरोना हॉटस्पॉट बवले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 258 वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला असून 45 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

15 ते 20 दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा कोरोनामुक्त होवून ग्रीन झोनमध्ये स्थान मिळवेल असे वाटत असतांनाच जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात कोरोनाच्य संसर्गाने विळखा घातला. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर राज्यात सर्वाधिक आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून ही मृत्यूची टक्केवारी जळगाव जिल्ह्यासाठी चिंता करण्यासारखी आहे. जळगाव जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील त्रुटी शोधून काढण्याची गरज आहे. त्यात जिल्ह प्रशासन कुठे कमी पडतेय याचाही शोध राज्य प्रशासनाने घेऊन तशा सूचना देण्याची गरज आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. जोडीला जिल्हा सामान्य रुग्णालयाची यंत्रणा आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाचा आणि जिल्हा सामान्य रग्णालयाचे सिव्हील सर्जन यांचेकडून जिल्ह्याच्या आरोग्याची यंत्रणा सुरळीत पार पडणे ही अपेक्षा असणे काही गैर नाही. तथापी अलिकडे दीन आणि सिव्हील सर्जन यांचेतील समन्वयाचा अभाव असणार्‍याचे आता सर्व बाजूने त्यावर टीकेचा भडीमार होतोय. कोरोनाचे संशयित रुग्ण कोवीड-19 रुग्णालयात दाखल झाल्यावर नंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल उशिरा म्हणजे 4-6 दिवसानंतर अहवाल मिळत असत. त्याचे एकमेव कारण म्हणजे संशयित रुग्णांचे स्लॅब घेतल्यानंतर ते धुळ्याला पाठवावे लागतात. धुळे येथे हिळे मेडिकल कॉलेजमध्ये संपूर्ण खान्देशाचा ताण असल्यामुळे तिथ या प्रयोग शाळेतून चाचणी अहवाल प्राप्त व्हायला उशिर लागतो. त्यामुळे संशयितांपैकी कोरोना बाधितचा आकडा कळायला विलंब होतोय. म्हणून संशयितांसह कोरोना बाधितांच्या संख्येवर परिणाम झाला.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना चाचणीच्या प्रयोग शाळेला मान्यता मिळाली. परंतू, अद्याप ती सुरु झालेली नाही. 15 मे पर्यंत सुरु होणार होती त्याचे काय झाले ? हे कळायला मार्ग नाही. जिल्हा प्रशासनाने विशेषत : पालकमंत्र्याने पुढाकार घेऊन ही प्रयोगशाळा सुरु करणे आवश्यक आहे. कोरोना चाचणी प्रयोग शाळा जळगावात नसल्याने त्याचा परिणाम कोरोना रुग्ण वाढण्यावर झाला. साहाजिकच मृत्यूदरही वाढला.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतांना जिल्हा शासकीय महाविद्यालयातील 235 डॉक्टरांची रजा मंजूर केली गेली कशी ? शहरातील खाजगी डॉक्टर पुढाकार घेऊन कोरोना रुग्णासाठी सेवा देताहेत आणि शासनाच्या सेवेतील 235 डॉक्टर रजेवर आहेत. कोरोना रुग्णांची सेवा करण्यास हे रजेवरील डॉक्टर तयार नसतील तर त्यांच्यावर तातडीने सक्त कारवाई करावी. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर इतर वैद्यकीय यंत्रणेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. हे 235 डॉक्टर सेवेत असते तर मृतांचा आकडा कमी होण्यासाठी सुद्धा होऊ शकला असता का ?

सुरुवातील जळगाव शहरातील मेहरुण आणि समतानगर मधील कोरोना बाधित दोन रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाच्या वतीने दक्षता घेऊन गतीमानतेने प्रशासनातर्फे अंमलबजावणी झाली नाही हे मात्र खरे आहे. सुरुवातील पीपीई किटची कमतरता होती. हे मान्य आहे परंतू त्यानंतर कोरोना हॉस्पिटलमध्ये सर्व वैद्यकीय सेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा करणार्‍यांसाठी काहीही सुविधा उपलब्ध नव्हती असे म्हणणे रास्त्र होणार नाही.

जळगाव जिल्ह्यात एकूण २५८ कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली असून त्यापैकी जळगाव ५४, अमळनेर- 104, भुसावळ- ५४, पाचोरा- 21, चोपडा-14, भडगाव-7, फैजपूर -2, मलकापूर-1 आणि खामगाव -1 असे बाधितांची संख्या आहे. यापैकी 29 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यात जळगाव -4, अमळनेर -10, भुसावळ- 9, पाचोरा -3, चोपडा- 3 जणांचा समावेश आहे, जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा पहाता राज्यात सर्वाधिक म्हणजे 12.5 टक्के इतकी आहे. ही मृत्यूदराची टक्केवचारी कमी होणे आवश्यक असून त्यासाठी उपचार करणार्‍या आरोग्य यंत्रणेची टीम सक्षम असणे आवश्यक आहे. एकूण कोरोना बाधित रुग्णांमधून बरे होणार्‍या रुग्णांची संख्या म्हणजे कोरोना मुक्त होणार्‍या रुग्णांची संख्या 45 इतकी आहे. ही बाब समाधानकारक असली तरी बरे होणार्‍यांचा दर म्हणजे टक्केवारीत आणखी वाढ होणे आवश्यक आहे.
जळगाव जिल्ह्यात तसेच शहरात कोरोनाने चौफेर शिरकाव केले आहे. अमळनेर नंतर भुसावळ आणि जळगाव ज्यापद्धतीने विविध भागात तसेच उच्चभ्रु भागात कोरोना बाधित रुग्ण आढळताहेत ही एक चिंतेची बाब म्हणावी लागेल.

आता लॉकडाउनचे तिसरे पर्व 17 मे ला संपून 18 पासून ते 31 मे पर्यंत वेगळ्या प्रकारच्या लॉकडाऊनचे चौथे पर्व सुरु होणार आहे. यात जिल्हा प्रशासनाने कंबर कसून कामाला लागणे आवश्यक आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपले राजकीय मतभेद विसरुन कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकत्रीतपणे काम केले पाहिजे. वैद्यकीय यंत्रतेतील समन्वय वाढवून कोरोनाशी लढा लढण्याची गरज आहे.

चांगभलं
– धों.ज.गुरव

Leave A Reply

Your email address will not be published.